वीस हजार अंगणवाडी कर्मचार्‍यांची लवकरच भरती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

वीस हजार अंगणवाडी कर्मचार्‍यांची लवकरच भरती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली आहे. लवकरच ही भरती सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली. त्याशिवाय मानधनवाढीसह नवीन मोबाईल, विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

राज्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक घेण्यात आली. महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक आदी या बैठकीला उपस्थित होते. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजार 186 पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून, ही भरती प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या निवृत्तीच्या एकरकमी लाभ योजनेसाठी एलआयसीकडे शासनाने 100 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. यासंदर्भातील प्रलंबित प्रकरणांवर तत्काळ कार्यवाही करून संबंधितांना पैसे देण्यासाठी भारतीय जीवन विमा महामंडळाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.

अंगणवाडी केंद्रासाठी सध्या अस्तित्वात असलेले वर्ग आणि भाड्याने घेतलेले वर्ग यांचा आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विभागाला दिल्या. आढाव्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये हे वर्ग भरविण्याच्या संदर्भात त्यांना आदेश देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल अंगणवाडी कर्मचार्‍यांना जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता लवकरच देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पोषण आहाराचा दर वाढविण्यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा झाली असून, लवकरच त्यात वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच, अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या महत्त्वाच्या मागण्यांवर लवकरच निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Back to top button