औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा; तिर्थक्षेत्र कचनेर (जि. औरंगाबाद) येथील श्री १००८ चिंतामणी भगवान पार्श्वनाथ अतिशय क्षेत्र येथील सव्वादोन किलोची सोन्याची मूर्ती चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशातून रविवारी (दि.25) उशिरा अटक केली. अर्पित नरेंद्र जैन (वय 32 रा.शिवपुरी जिल्हा गुणा मध्य प्रदेश), अनिल भवानिदिन विशवकर्मा (27 रा. शहागड मध्य प्रदेश) अशी चोरट्यांची नावे आहेत. या दोघांकडून 94 लाख 87 हजार 797 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कलवनिया यांनी पुढे सांगितले की, कचनेर येथील जैन मंदिरात पार्श्वनाथ भगवंताच्या दोन किलो वजनी सोन्याच्या मूर्तीची नोव्हेंबर महिन्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केली होती. १९ डिसेंबर रोजी पार्श्वनाथ जयंती असल्यामुळे पार्श्वनाथ भगवंताचा अभिषेक करण्यात आला. त्यावेळेस मूर्तीचा रंग जात असल्याने त्याची तपासणी केली असता, ती मूर्ती तांब्याची असल्याचे समोर आले. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली. त्यावेळी ही चोरी सेवकांनी केल्याचे समोर आले. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने थेट मध्य प्रदेश गाठून वरील दोघांना ताब्यात घेतले.
दरम्यान चोरट्यांनी मूर्तीचे तुकडे करून ती विकली व त्या बदल्यात सोन्याचे बिस्कीट, कॉईन व कर्ज फेडण्यासाठी आलेल्या पैशाचा उपयोग केला.
मूर्ती चोर अर्पित व अनिल यांच्याकडून पोलिसांनी सोन्याचे तुकडे, सोन्याचे बिस्कीट, दोन कॉईन, दोन मोबाईल, इलेक्ट्रिक कटर, एक हाथोडा, लोखंडी पकड, एक्सा ब्लेड, इलेक्ट्रिक वजन काटा आदी 94 लाख 87 हजार 797 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हेही वाचा :