औरंगाबाद : अंगणात चूल पेटवताना महिलेवर १५ ते २० मोकाट कुत्र्यांचा हल्‍ला; महिला गंभीर जखमी | पुढारी

औरंगाबाद : अंगणात चूल पेटवताना महिलेवर १५ ते २० मोकाट कुत्र्यांचा हल्‍ला; महिला गंभीर जखमी

वरठाण ; पुढारी वृत्‍तसेवा : अंगणात चुल पेटविण्यासाठी घराबाहेर आलेल्या महिलेवर १५ ते २० कुत्र्यांच्या टोळक्यांनी अचानकपणे हल्ला केला. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. ही घटना वरठाण येथे आज (मंगळवार) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. गंभीररीत्या जखमी झालेल्या महिलेचे नाव प्रमिलाबाई अणिल खंडाळे (वय ४५ ) आहे. ह्या महिलेस तात्काळ पाचोरा येथे प्रथम उपचार करुन पुढील उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वरठाण येथील महिला सकाळी पाच वाजता अंगणात चूल पेटविण्यासाठी आली असता, गावात मोकाट फिरणारी जवळपास पंधरा ते वीस कुत्र्यांच्या टोळक्यांनी या महिलेवर अचानकपणे हल्ला केला. सदर महिलेला कुत्र्यांनी लचके तोडून दहा ते पंधरा फूट अंतरावर ओढत नेले. तेव्हा महिलेने आरडाओरडा केल्याने महिलेचा मुलगा रोषण खंडाळे व गल्लीतील, नामदेव सुर्यवंशी, चेतन जैन, विजयसिंग खंडाळे, प्रविण सोळंके, संदीप सोळंके, अशोक चौधरी, राजेंद्र खंडाळे, मयुर चौधरी आदींनी काठा लाठ्यांनी मोकाट कुत्र्यांना हुसकावित महिलेची सुटका केली.

या हल्ल्यात महिलेच्या हाता- पायाचे व चेहऱ्यावरील लचके तोंडून त्‍यांना रक्तबंबाळ केले. गंभीररीत्या जखमी झालेल्‍या महिलेला नागरिकांनी पाचोरा येथे प्रथम उपचार करुन पुढील उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

सोयगाव तालुक्यात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट..

सोयगाव तालुक्यात ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपुर्वी जळगाव जिल्ह्यातील काही मोकाट कुत्रे रात्रीच्यावेळी एका वाहनात आणून सोडण्यात आली आहेत. गावातील कुत्री व बाहेरील कुत्री आमने-सामने आल्यावर मोठा संघर्ष होत असतो. या कुत्र्यांमध्ये अनेक कुत्र्यांना अनेक आजारांची लक्षणे देखील आहेत. ही मोकाट कुत्री महिलांच्या तसेच लहान बालकांच्या अंगावर धावून येत असल्याच्या घटना घडत आहेत. त्‍यामुळे नागरिकांसाठी धोकादायक बनलेल्‍या या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी तालुक्‍यातील नागरिकांतून होत आहे. दरम्‍यान कुत्र्याने चावा घेतल्‍यास आरोग्‍य विभागाकडे रेबीजची लस देखील उपलब्‍ध नाही, त्‍यामुळे नागरिकांमध्ये या मोकाट कुत्र्यांमुळे दहशत निर्माण झाली आहे.

हेही वाचा :

Back to top button