औरंगाबाद- पुणे महामार्गावर एसटी बस जळून खाक, २४ प्रवासी थोडक्यात बचावले | पुढारी

औरंगाबाद- पुणे महामार्गावर एसटी बस जळून खाक, २४ प्रवासी थोडक्यात बचावले

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या बसला औरंगाबाद- पुणे महामार्गावर ढोरेगावजवळ रविवारी (दि. २१) रोजी रात्री एक वाजता आग लागली. या आगीत एसटी बस जळून खाक झाली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या बसमधील २४ प्रवासी थोडक्यात बचावले.

याबाबतची माहिती अशी की, हिंगोली आगाराची निमआराम बस ( क्र. एमएच १४ बिटी ४८०५ ) नाशिक बसस्थानक येथून २५ प्रवासी घेऊन गंगापूर मार्गे हिंगोलीला जात होती. ढोरेगावापासून पुढे काही अंतरावर पेंडापूर फाट्यावर आल्यानंतर गाडीच्या इंजिनखालून धूर येत असल्याचे बस चालक रामेश्वर लोखंडे (वय ३६ वर्ष) यांच्या लक्षात आले. या दरम्यान चालकाने प्रसंगावधान राखत बस थाबवून प्रवाशांना सामानासह खाली उतरून घेतले. यामुळे मोठा अनर्थ टळला.

या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक चोरे, पोहेकॉ. अमीत पाटील, राहुल वडमारे, श्रीकांत बर्डे, रिजवान शेख, रवी लोदवाल, पदम जाधव, आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर प्रवाशांना सुरक्षित स्थळी हालवले व अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच बसला आग लागली. त्यानंतर एक तासाच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणली. या घटनेची माहिती मिळताच गंगापूर आगारप्रमुख मनिष जवळीकर यांनी बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून पाठवून दिले. मध्यरात्रीची वेळ असल्याने लवकर मदत मिळाली नसल्याने बस जळून खाक झाल्याचे प्रवाशांनी म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button