औरंगाबाद : बंडखोर आसामात, कुटुंब मतदारसंघात; पोलिस बंदोबस्त | पुढारी

औरंगाबाद : बंडखोर आसामात, कुटुंब मतदारसंघात; पोलिस बंदोबस्त

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी खबरदारी म्हणून गुजरातमार्गे आसाम गाठले. त्यात औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल आणि औरंगाबाद पश्‍चिमचे आमदार संजय शिरसाट यांचाही समावेश आहे. हे दोन्ही आमदार आसाममध्ये असले, तरी त्यांची कुटुंबं मात्र इथेच आहेत. याशिवाय कॅबिनेट मंत्री आणि पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांचे कुटुंबदेखील शहरातच असल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिसांनी या तिन्ही आमदारांच्या कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

आमदारांच्या बंडखोरीमुळे सध्या सामान्य शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. आमदार समर्थकही गोंधळात पडलेले आहेत. नेमकी कोणती भूमिका घ्यावी, हे त्यांना समजत नसल्याची स्थिती आहे. काही पदाधिकारी, कार्यकर्ते या आमदारांच्या कार्यालयांमध्ये चकरा मारत आहेत. तर काही शिवसैनिकांमध्ये बंडखोर आमदारांविषयी रोष बघायला मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल आणि संदीपान भुमरे यांच्या कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आमदारांचे कुटुंबीय त्यांच्या घरीच असून त्यांचे लक्षही राज्यस्तरावरील घडामोडींकडे लागले आहे.

प्रदीप जैस्वाल यांचे पुत्र आणि युवा सेनेचे पदाधिकारी ऋषीकेश जैस्वाल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कालपर्यंत मी परदेशात होतो. काल रात्रीच शहरात परतलो आहे. माझे अजूनही वडिलांशी बोलणे झालेले नाही, त्यांच्याशी बोलणे झाल्यानंतरच माझी पुढील भूमिका ठरेल. सध्या तरी आम्ही शहरात आहोत. आमदार संजय शिरसाट यांच्या कार्यालयाबाहेर पोलिस तैनात करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button