माझे कथन खोटे वाटत असल्यास टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासा ; असे म्हणत आ. कैलास पाटीलांनी शेअर केले फोटो | पुढारी

माझे कथन खोटे वाटत असल्यास टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासा ; असे म्हणत आ. कैलास पाटीलांनी शेअर केले फोटो

उस्मानाबाद, पुढारी वृत्तसेवा : दिशाभूल करुन सुरतला नेले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर खुबीने एकनाथ शिंदे गटाच्या तावडीतून निसटलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. कैलास पाटील यांनी ट्रकमधून प्रवास केलेला फोटो (सेल्फी) गुरुवारी (दि. 23) शेअर केला. आ. पाटील तसेच अकोल्याचे आ. नितीन देशमुख यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटाने दिशाभूल करून सुरतला कसे नेले व तेथून या दोन्ही आमदारांनी सहीसलामत निसटत मुंबई कशी गाठली याचे अनुभव ऐकवले.

आ. पाटील यांनी सांगितले, की विधान परिषदेसाठी मतदान झाल्यानंतर ठाण्याच्या महापौर बंगल्यावर एकनाथ शिंदे यांनी भेटण्यासाठी बोलावल्याने गेलो होतो, पण साहेब पुढे थांबले आहेत, असे सांगून गाड्या आम्हाला घेऊन पुढे निघाल्या. दरम्यानच्या काळात सहकार्‍यांची चर्चा ऐकून काहीतरी वेगळं घडतंय अशी शंका आली.तोपर्यंत सीमा तपासणी नाका आल्याने तिथे वाहतूक तुंबली होती. ती संधी साधून मी गाडीतून उतरलो आणि एक दुचाकीस्वार, पुढे ट्रकमधून प्रवास करीत मुंबई गाठल्याचा थरार सांगितला होता.

माझे कथन खोटे असेल तर टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासा. यातून खरे व खोटे कोण बोलत आहे ते स्पष्ट होईल, असा टोला आ. पाटील यांनी लगावला. यासाठी पुरावा म्हणून आ. पाटील यांनी ज्या ट्रकमधून प्रवास केला होता, त्याच्या चालक व क्लीनरसोबत घेतलेला फोटो तसेच ट्रकनंबरही शेअर केला आहे.

Back to top button