गोपनियतेचा भंग : औरंगाबाद मनपा प्रभाग रचनेचा आराखडा सोशल मीडियावर व्हायरल | पुढारी

गोपनियतेचा भंग : औरंगाबाद मनपा प्रभाग रचनेचा आराखडा सोशल मीडियावर व्हायरल

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध होण्याआधीच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आराखड्याच्या गोपनियतेचा भंग झाला आहे. या कारणास्तव आता शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट हे सोमवारी राज्य निवडणूक आयोगाकडे त्याबाबत रितसर तक्रार करणार आहेत. आराखडा फोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार शिरसाट यांनी केली आहे. (Aurangabad)

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने डिसेंबर २०२१ मध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार प्रारुप आराखडा तयार करुन तो राज्य निवडणूक आयोगाला सादर केला. आता त्या आराखड्यात सुधारणा करुन अंतिम आराखडा तयार करण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेचे पथक मुंबईत निवडणूक आयोगाकडे दाखल झाले आहे. प्रारुप आराखडा अंतिम करण्याच्या हालचाली सुरु झालेल्या असताना, आयोगाकडे सादर करण्यात आलेला प्रारुप आराखडाच फुटल्याची चर्चा सुरु झाली आहे.

सोशल मीडियावर या आराखड्याचे काही भाग व्हायरल झाले आहेत. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. प्रारुप आराखडा व्हायरल करण्यामागे महापालिकेतील काही कंत्राटी कर्मचाऱ्यांचा हात असल्याची कुजबुज आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी या प्रकरणात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचे ठरविले आहे. या प्रकरणात शिरसाट हे सोमवारी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली

महापालिकेतील काही अधिकारी त्यांच्या जवळच्या नातेसंबंधातील व्यक्तींना निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. त्यांना प्रभागांची पूर्वकल्पना यावी यासाठी हा खटाटोप करण्यात आल्याचे देखील बोलले जात आहे. महापालिका निवडणुकीसाठी फेब्रुवारी २०२० मध्ये तयार करण्यात आलेली वॉर्ड रचना वादग्रस्त ठरली होती. त्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले होते. त्यात सुनावणीदरम्यान मनपाने आणि राज्य निवडणूक आयोगाने नवीन प्रारुप रचना तयार करताना गोपनियतेचा भंग होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, आता प्रभाग रचनेचा आराखडा व्हायरल झाल्याने या आदेशाचीही पायमल्ली झाल्याचे चित्र आहे.

प्रारुप आराखड्याचे काम गोपनिय पद्धतीने होणे गरजेचे आहे. परंतु हा आराखडा निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध होण्याआधीच व्हायरल झाला आहे. हा गोपनियतेचा भंग आहे. मी सोमवारी राज्य निवडणूक आयोगाकडे जाऊन तक्रार करणार आहे.
– संजय शिरसाट, आमदार

हेही वाचा

Back to top button