औरंगाबाद : आम्ही अंगावर केसेस घ्यायला तयार; अमित ठाकरेंनी दिलं पोलिसांना आव्हान | पुढारी

औरंगाबाद : आम्ही अंगावर केसेस घ्यायला तयार; अमित ठाकरेंनी दिलं पोलिसांना आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे १ मे रोजी जाहीर सभा होणार आहे. या सभेला पोलिसांनी परवानगी तर दिलीय, मात्र पोलिसांनी तब्बल १६ अटीही ठेवल्या आहेत. आता या अटींवरून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी थेट पोलिसांना आव्हान दिले आहे. दाखल केसेस अंगावर घ्यायला तयार असल्याचे म्हणत अमित यांनी हे आव्हान दिले आहे. अमित ठाकरे हे औरंगाबादमध्ये पोहोचले आहेत.

दरम्यान, राज ठाकरे यांनी पुणे येथील वढू बुद्रुकमध्ये संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यानंतर ते औरंगाबादकडे रवाना झाले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

राज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या जाहीर सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यमांनी अमित यांना आवाजाच्या मर्यादेबाबत पोलिसांनी घालून दिलेली अट पाळणं शक्य होईल का? असा प्रश्न विचारला. तेव्हा अमित म्हणाले, १ मे रोजी होणारी सभा भव्य असेल आणि आम्ही अंगावर केसेस घ्यायला तयार आहोत.

अमित यांनी सभेच्या ठिकाणचा घेतला आढावा

औरंगाबादमधील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदानातून राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या सभेला मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यावेळी अमित यांनी स्वत: सभास्थळी जाऊन सभा तयारीचा आढावा घेतला. पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या तयारीवर मी खूश आहे, अशी प्रतिक्रिया अमित यांनी दिली.

Back to top button