औरंगाबाद : ३०:३० घोटाळ्यातील म्होरक्या संतोष राठोडच्या बँक खात्यातून १५० कोटींचे ट्रान्झॅक्शन | पुढारी

औरंगाबाद : ३०:३० घोटाळ्यातील म्होरक्या संतोष राठोडच्या बँक खात्यातून १५० कोटींचे ट्रान्झॅक्शन

औरंगाबाद, गणेश खेडकर : ३०:३० घोटाळ्याचा म्होरक्या संतोष ऊर्फ सचिन नामदेव राठोड (रा. मुंडवाडी तांडा, ता. कन्नड) याच्या आयसीआयसीआय बँकेच्या आणि दुसऱ्या पत्नीच्या एसबीआय बँक खात्यातून तब्बल १५० कोटींचे ट्रान्झॅक्शन झाल्याचे समोर आले आहे. परंतु, आयसीआयसीआय बँकेतील खात्यात एक रूपयाही शिल्लक नाही.

धक्कादायक म्हणजे, राठोडकडून जप्त केलेल्या डायरीतून तब्बल तीनशेहून अधिक कोटींचे व्यवहार उघड झाले आहेत. यात बिडकीन, औरंगाबाद, कन्नड आदी परिसरातील राजकीय नेते, पदाधिकारी, डॉक्टर, पोलिस अधिकारी, कर्मचारी, अन्य खात्याचे शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि बहुतांश शेतकऱ्यांची नावे आहेत, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. दरम्यान, राठोडने नाशिकच्या मित्रामार्फत कोलकाता येथे मोठी रक्कम गुंतविली असल्याचा दावा केला जात आहे. बिडकीन पोलिस त्यादृष्टीनेच तपास करीत आहेत.

आरोपी संतोष राठोड हा नोकरदार किंवा कुठलाही मोठा व्यवसाय नाही. तसेच तो ना उद्योजक आहे, ना धनाढ्य शेतकरी. त्यामुळे त्याच्या खात्यातून झालेले तब्बल दीडशेहून अधिक कोटींचे व्यवहार या घोटाळ्याची व्याप्ती स्पष्ट करतात. ३०:३० घोटाळ्यात २१ जानेवारी रोजी दौलत राठोड यांच्या तक्रारीवरून बिडकीन ठाण्यात कृष्णा राठोड, पंकज चव्हाण यांच्यासह संतोष राठोडविरुद्ध गुन्हा दाखल आहे. यातील संतोष राठोडला बिडकीन ठाण्याचे सहायक निरीक्षक संतोष माने यांनी अटक केली. त्याला सुरुवातीला तीन दिवसांची कोठडी सुनावली होती. २४ रोजी पुन्हा हजर केले असता न्यायालयाने त्याला ३१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, पोलिस कोठडीतील आरोपी संतोष राठोडच्या माहितीवरून त्याचा नातेवाईक राजेंद्र देविदास पवार (रा. रोहिदासनगर, सातारा परिसर) याच्‍याकडून पैशांचा हिशोब असलेल्या तीन डायऱ्या पोलिसांनी जप्‍त केल्या. त्यात ३०० जणांची नावे आणि त्यांनी गुंतविलेली रक्कम व त्यांना द्यावयाचा परतावा याचा तारखांसह उल्लेख आहे. यात तीन लाखांपासून ते अडीच कोटींपर्यंतची गुंतवणूक करणाऱ्यांची नावे आहेत.

तसेच, आरोपींनी ही रक्कम मित्र शकील लियाकत (शंकरनगर, नाशिक) याच्‍याकडे ठेवल्याचे पोलिसांना सांगितले होते. परंतु, पोलिसांना शकील लियाकतच्या घर झडतीत काहीही हाती लागले नव्हते. तेथून पुढील कनेक्शन हे कोलकाता असल्याचे बोलले जात होते. लियाकतच्या मार्फतने राठोडने पुढे कोलकाता येथील सुशील यादव पटेल याच्यासह अन्य तिघांकडे गुंतवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिस दलालांना का सोडताहेत

३०:३० घोटाळ्यात संतोष राठोड म्होरक्या असला तरी त्याला अनेक दलालांची साथ होती. औरंगाबाद शहर, कन्नड, बिडकीन भागातील राजकीय पदाधिकारी, हॉटेल चालक, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नातेवाईकांचा दलालांमध्ये मोठा भरणा आहे. पोलिस या दलालांना आरोपी करून अटक का करीत नाहीत? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अनेक क्लास वन अधिकारी, बिडकीन, औरंगाबाद व कन्नड भागातील राजकीय पदाधिकारी यांनी दलाली केलेली आहे.

कन्नडचा तो नगरसेवक कोण?

म्होरक्या संतोष राठोड हा मूळचा मुंडवाडी तांडा (ता. कन्नड) येथील आहे. त्याचा तेथे मोठा बंगला आहे. पत्नीशी त्याचा वादविवाद असून त्याने दुसरे लग्न केल्याचेही उघड झाले आहे. दरम्यान, पहिल्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यावर त्याने मुंडवाडी तांडा येथे मोठा फिल्मी शो केला होता. दरम्यान, कन्नडच्या एका नगरसेवकानेही राठोडकडे लाखो रुपये गुंतवल्याचे बोलले जाते. परतु, अद्याप त्याचा नावाचा खुलासा झालेला नाही. याशिवाय काही डॉक्टरही यात पैसे गुंतवणुक केल्याचे पुढे आले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button