

ठाणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार, दि. 28 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला. यावेळी ठाण्यातील परबवाडी शिवसेना शाखा येथून आयटीआय वागळे सर्कल अशी रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री यांनी आपला उमेदवारीचा अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आदी मुख्य पदाधिकारी उपस्थित होते.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोपरी पाचपखाडी मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. आपल्या मतदार संघात प्रचंड असे शक्ती प्रदर्शन करीत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या प्रभावाची चुणूक दाखवून दिली. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र पाठक, मीनाक्षी शिंदे, आर सी पाटील यांच्यासह अनेक महायुतीचे नेते उपस्थित होते
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले गुरु धर्मवीर आनंद दिघे यांचे आनंदाश्रमात जाऊन दर्शन घेतले. संत एकनाथ महाराज यांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी ठाण्यात येऊन एकनाथ शिंदे यांना शुभाशीर्वाद दिले. तत्पूर्वी घरातून निघताना पत्नी लता शिंदे आणि सून वृषाली शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचे औक्षण केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शक्तीप्रदर्शनाला सुरुवात झाली. अनाथांचा नाथ, एकनाथ या गाण्यावर सर्व कार्यकर्ते भारावून गेले होते. रॅलीमध्ये अभूतपूर्व अशी गर्दी झाली होती. सर्व वातावरण भगवेमय झाले होते. राष्ट्रवादी, भाजप आरपीआय यांच्यासह महायुतीचे सर्व स्थानिक नेते आणि कार्यकर्ते या रॅलीत उपस्थित होते. रस्त्यावरील या गर्दीमुळे वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणावर झालेली दिसून आली. वागळे इस्टेट मधील गल्लीतून ही जोरदार शक्तिप्रदर्शन करीत मुख्यमंत्र्यांनी कोपरी पाचपाखाडी हा आपला बालेकिल्ला कसा आहे हे पुन्हा एकदा या शक्ती प्रदर्शनातून दाखवून दिले .त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदार संघातून पाचव्यांदा उमेदवारी अर्ज भरला आहे.
2004 मध्ये ठाणे विधानसभेतून शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे पहिल्यांदा आमदार झाले. 2009 साली विभाजन होऊन निर्माण झालेल्या कोपरी-पाचपाखाडी या एकनाथ शिंदे यांचे होमग्राऊंड असलेल्या मतदारसंघातून शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली. तेव्हापासून झालेल्या तीन निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांनी विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. किंबहूना या मतदारसंघाचे नेतृत्व करत असताना पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री, नगरविकासमंत्री आणि आता सर्वोच्च मुख्यमंत्रिपदापर्यंत एकनाथ शिंदे यांनी मजल मारली आहे.