

कोल्हापूर : भाजपविरोधात समविचारी पक्षांसोबत आघाडीची ‘वंचित’ची तयारी आहे. मात्र, तसे न झाल्यास प्रसंगी महापालिकेच्या सर्व जागा लढवू, असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष, माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दसरा चौकात बुधवारी आयोजित केलेल्या विजयी संकल्प महासभेत महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
राजकीय पक्ष जोपर्यंत जिवंत आहेत, तोपर्यंत लोकशाही टिकणार आहे. हे लक्षात आल्यानंतर भाजपकडून आता राजकीय पक्षांनाच संपविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत अॅड. आंबेडकर म्हणाले, लोकशाहीची खरी गरज वंचित समाजाला आहे. त्यांनी भाजपचा हा मनसुभा हाणून पाडण्यासाठी पुढे यावे.
मुंबईत भाजप शिंदे शिवसेनेसोबत युती करेल की नाही, शंका आहे. युती केली तर शिंदेसेना 100 ते 125 जागांची मागणी करणार; परंतु भाजप तेवढ्या जागा कशा देईल? 30 ते 40 जागांवर लढा म्हणून सांगतील आणि त्यांना ते ऐकावे लागेल, असे सांगत ते म्हणाले, लष्करप्रमुखांचे एक मत आणि पंतप्रधानांचे एक मत असे देशात गेल्या 70 वर्षांत कधी घडले नव्हते, ते या सरकारमध्ये घडले. देशाची लूट सुरू आहे. ठरावीक घराण्यांना श्रीमंत करून नव्याने गुलामी देशावर आणली जात आहे. लोकशाही टिकविण्याची जबाबदारी फुले, शाहू, आंबेडकर विचारांवर आहे. त्यासाठी ‘वंचित’ला साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्य कमिटीचे सदस्य इम्तियाज नदाफ यांनी, महापालिकेवर मनुवादी किंवा गांधीवादी विचारांचा नव्हे तर आंबेडकरवादी विचारांचा झेंडा फडकवावा, असे आवाहन केले. कोल्हापूर उत्तरचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड म्हणाले, झुंडशाही, घराणेशाही मोडीत काढण्याची संधी या निवडणुकीमुळे मिळाली आहे. आता ‘वंचित’ची ताकद दाखवून देऊ. राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे म्हणाले, आरक्षण काढून घेण्याचा भाजपचा उद्योग थांबविण्यासाठी महायुतीपासून सावध राहा.
यावेळी राज्य प्रवक्ता सिद्धार्थ पोकळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. क्रांती सावंत, कोल्हापूर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष बाबुराव आयवळे यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविकामध्ये कोल्हापूर महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे यांनी मनपाच्या सर्व जागा लढविण्यात येतील, असे सांगितले. सिद्धार्थ कांबळे यांनी आभार मानले.
अॅड. आंबेडकर म्हणाले
* युती, आघाडी कुठे कराव्या, कुठे नको याचे भान राजकीय पक्षांना राहिले नाही.
* सत्तेसाठी विचारधारा दुय्यम ठरत आहे.
* लोकशाही टिकविण्यासाठी मतांची ‘त्सुनामी’ तयार करा.
* चीनबाबत सरकार आणि लष्कराच्या भूमिकेत विरोधाभास
* आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत एकटा पडत असल्याचा आरोप
* आधी ‘युती करणार नाही’ असे सांगून नंतर युती करणे ही जनतेची फसवणूक
कोल्हापुरात बंटी-बबलीच्या निवडणुका
कोल्हापूर मनपा निवडणुका बंटी-बबलीच्या निवडणुका असल्याचे सध्याच्या राजकारणावरून दिसून येत असल्याचे अॅड. आंबेडकर यांनी सांगितले.