संगमनेर : 135 पैकी 119 सोसायट्या थोरात गटाकडे
संगमनेर विशेष : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील 171 गावांमधील 135 विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकात मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या त्या-त्या गावांतील शिलेदारांनी आपापले गड शाबूत राखले. 135 सोसायट्यांपैकी मंत्री थोरात यांच्या समर्थकांच्या ताब्यात 119 सोसायटीची सत्ता आली आहे.
त्यामुळे भविष्यात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात संगमनेर तालुक्याचे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे.
राजकारणाचा मूळ पाया समजल्या जाणार्या गावागावांतील स्थानिक पातळीवरील संस्था ताब्यात ठेवण्यासाठी नेतृत्वाची कसोटी आपापल्या कार्यकर्त्यांमार्फत पणाला लागत असते. कारण या संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावात आपल्या गटाचे वर्चस्व राहावे, हा मूळ उद्देश असतो. त्याचबरोबर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून विविध ठराव केले जातात.
या ठरावांचा फायदा जिल्हा बँक आणि शेतकी संघाच्या निवडणुकीत होत असतो. त्यामुळे राजकारणाचा मूळ पाया समजल्या जाणार्या या निवडणुका स्थानिक पातळीवर अतिशय प्रतिष्ठेच्या केल्या जातात. संगमनेर तालुक्यातील 171 गावात 135 विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या आहेत. या सर्व सोसायट्यांची संचालक मंडळाची मुदत गत दोन वर्षांपूर्वी संपलेली होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने या निवडणुका तब्बल दोन वर्षे पुढे ढकलल्या गेल्या होत्या.
मात्र, सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी असल्याने या सर्व संस्थांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाच्या ताब्यात तब्बल 119 सोसायट्यांची सत्ता आली आहे. त्यामध्ये 64 सोसायट्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली, तर 55 विविध कार्यकारी सेवा सोसायट्याच्या निवडणुका प्रत्यक्ष पार पडल्या. यामध्ये थोरात गटाने बाजी मारली आहे.
थोरातांच्या शेतकरी विकास मंडळाने तब्बल 119 संस्थांवर आपला झेंडा फडकावला आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 10 आणि पंचायत समितीच्या 20 जागांचे निकाल जवळजवळ स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील विरोधकांचे धाबे दणाणले आहे. मंत्री थोरात यांच्या सुसाट सुटलेल्या या वारूला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत रोखण्याचे आव्हान संगमनेरच्या विरोधकांपुढे उभे ठाकले आहे.
जि.प. व पं. स. एकहाती येणार?
संगमनेर तालुक्यातील 171 गावांत 135 विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या आहेत. त्यातील 119 संस्थांवर थोरात गटांचा झेंडा आहे. भविष्यात येऊ घातलेल्या जि. प. व पं. स. निवडणुकात संगमनेर तालुक्याचे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे.

