शेवगाव : नगरपरिषद प्रारूप मतदारयादीत घोळ

शेवगाव : नगरपरिषद प्रारूप मतदारयादीत घोळ

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव नगरपरिषद निवडणुकीच्या प्रारूप मतदारयादीत मोठ्या प्रमाणात घोळ असून यात पती, पत्नीची ताटातूट केल्याचा आरोप माजी नगरसेवक कमलेश गांधी यांनी केला आहे. शेवगाव नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम चालू आहे. गत आठवड्यात प्रभागनिहाय सदस्य आरक्षण सोडत काढण्यात आली. आता दि. 21 रोजी प्रारूप मतदारयाद्या जाहीर झाल्या आहेत. त्यावर दि. 27 पर्यंत हरकती घेता येणार आहेत.

इच्छुक उमेदवार मतदारयादीची तपासणी करीत आहेत. मात्र या तपासणीत प्रभागातील मतदारांची तोडफोड केल्याचे लक्षात आल्याने अनेक इच्छुक अचंबित झाले आहेत. एका प्रभागाची यादी घेण्यास 500 रुपयांचे शुल्क आकारले जाते, त्यामुळे आपल्या प्रभागातील काही मतदारांची नावे कुठल्या प्रभागात आहेत, हे पाहण्यासाठी शुल्क भरुन इतर प्रभागांतील याद्या घ्याव्या लागत असल्याचा भुर्दंड बसत आहे.
दरम्यान, या निवडणुकीसाठी 12 प्रभाग मध्ये जवळपास 33 हजार 300 मतदार आहेत.

प्रारूप मतदारयादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याची तक्रार माजी नगरसेवक कमलेश गांधी यांनी केली आहे. कुठल्याही प्रभागातील मतदार कुठेही जोडले आहेत. पती एका प्रभागात, तर पत्नी दुसर्‍या प्रभागात आणि मुलगा तिसर्‍याच प्रभागात, अशी मतदारात ताटातूट झाल्याचे दिसून येते. ही मतदारयादी तयार करताना नगरपरिषद कर्मचार्‍यांनी घरांची स्थळपाहणी न करता एका जागेवर बसून याद्या केल्या असाव्यात, अशी शंका निर्माण होते.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे नव्याने आल्याने त्यांना याबाबत कुठलीही माहिती नाही.आपल्या प्रभागातील मतदार कोणत्या प्रभागात जोडले, याची शहानिशा करण्यास सर्व याद्या चाळाव्या लागणार आहेत. त्या कधी पाहाव्यात हा खरा प्रश्न आहे. या चुकीमुळे मतदारांत संभ्रम तयार होणार आहे. त्यांना त्यांची नावे सापडणे मुश्किल होणार असल्याने हरकती घेण्यास मोठी अडचण येणार आहे. त्यामुळे घर ते घर सर्वेक्षण करुनच निर्दोष मतदारयाद्या तयार कराव्यात, अन्यथा वरिष्ठ पातळीवर न्याय मागण्यात येईल, असा इशारा गांधी यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news