

राहुरी : पुढारी वृत्तसेवा
लग्न लावून देण्याच्या उद्देशाने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील कणगर येथे दि. 31 मे रोजी घडली आहे. या घटनेबाबत तिघा जणांवर अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला.
15 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही राहुरी तालुक्यातील कणगर परिसरात तिच्या आई-वडिलांसोबत राहते. दि. 31 मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता अल्पवयीन मुलगी तिच्या आई-वडिलांच्या कायदेशीर रखवालीत असताना या घटनेतील आरोपी यांनी देवाला घेऊन जातो. असे सांगून फिर्यादीच्या घरून त्या मुलीला बोलावून घेतले आणि घेऊन गेला.
दोन दिवस होऊनही मुलीला पुन्हा घरी घेऊन आला नाही. आरोपींनी त्या अल्पवयीन मुलीला लग्न लावण्याच्या उद्देशाने घेऊन गेल्याचा त्या मुलीच्या आईला संशय आला. मुलीच्या आईने राहुरी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी मनीषा सोमनाथ हारदे, सोमनाथ साहेबराव हारदे, लताबाई साहेबराव हारदे (सर्व रा. वडनेर, ता. राहुरी) या तिघांंवर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर आरोपी पसार झाला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.