

मोहटा : पुढारी वृत्तसेवा
मोहटा देवस्थानचे विश्वस्त अॅड. विजय वेलदे यांनी आमदार मोनिका राजळे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मोहटा देवस्थानला वन विभागाकडून नऊ एकर जमीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ताब्यात आलेल्या जागेत देवस्थानला अनेक विकास कामे करता येणार आहेत.
जमीन मिळावी यासाठी देवस्थान शासन दरबारी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते. मोहटा देवस्थानला विकास कामे करताना जागेची मोठी गरज भासत होती. मोहटा देवीचे मंदिर डोंगरावर असून, मंदिर शेजारील जमीन वनविभागाची असल्याने देवस्थानला जागा अपुरी पडून विकास कामे करताना मर्यादा येत होत्या.
वन विभागाची जमीन मिळावी यासाठी पूर्वी अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले; मात्र उपयोग झाला नाही. वेलदे यांनी देवस्थानची ही मागणी आमदार राजळे यांच्या कानावर घालत. तुम्ही प्रयत्न करा, असे सांगितल्यानंतर राजळे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची व देवस्थान विश्वस्तांची मुंबई येथे बैठक घालून दिली.
या बैठकीत वन विभागाची जागा देवस्थानला मिळावी असा प्रस्ताव सादर केल्यानंतर मंत्री थोरात यांनी हिरवा कंदील दाखवताच महसूल व वन विभागाचे सचिव हेमंत डांगे यांनी वन विभागाची जमीन देवस्थानला हस्तांतरित करण्यास मान्यता दिली. ही जमीन मिळाल्यानंतर भाविकांना अधिक सुविधा देवस्थान देऊ शकेल.