

नगर : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल (2022) मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या निकालात पुणे जिल्ह्याला मागे टाकत नगरने बाजी मारली आहे. पुणे विभागाचा निकाल 93.61 टक्के लागला असून, विभागात मुलींनी बाजी मारली आहे. बारावीच्या निकालात सोलापूर पहिल्या स्थानी, अहमदनगर दुसर्या, तर पुणे विभाग तिसर्या स्थानी आहे. पुणे विभागात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 95.15 टक्के, तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.38 टक्के आहे.
पुणे विभागातून 2 लाख 44 हजार 308 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर 2 लाख 42 हजार 496 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 2 लाख 27 हजार 22 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागात या वर्षी पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. या वर्षी 1 लाख 7 हजार 865 विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी 1 लाख 2 हजार 642 मुली उत्तीर्ण झाल्या असून, विभागात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 95.15 टक्के आहे. विभागातून 1 लाख 34 हजार 631 मुले परीक्षेला बसली होती. त्यापैकी 1 लाख 24 हजार 380 मुले उत्तीर्ण झाली आहेत. विभागात मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.38 टक्के आहे.
मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 2.77 टक्क्यांनी जास्त आहे. विभागातून 5 हजार 488 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 2 हजार 623 असून, निकालाची टक्केवारी 47.91 आहे.
विभागात सोलापूर जिल्हा अव्वल
पुणे विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 94.83 टक्के लागला आहे. त्याखालोखाल अहमदनगर जिल्ह्याचा निकाल 94.41 टक्के लागला आहे. विभागात सर्वांत कमी निकाल पुणे जिल्ह्याचा लागला असून, तो 92.70 टक्के एवढा आहे. सोलापूर जिल्ह्यातून 53 हजार 533 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 50 हजार 768 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल 94.83 टक्के लागला आहे. पुणे जिल्ह्यातून एकूण 1 लाख 25 हजार 959 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1 लाख 16 हजार 768 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल 92.70 टक्के एवढा लागला आहे. अहमदनगर जिल्ह्यातून 63 हजार 004 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 59 हजार 486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल 94.41 टक्के लागला आहे. विभागातील तीनही जिल्ह्यांत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असून, यंदाही निकालात मुलींचे वर्चस्व कायम राहिले आहे.
जिल्हानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी
पुणे जिल्ह्यातील उत्तीर्ण विद्यार्थी
1 लाख 16 हजार 768
अहमदनगर जिल्ह्यातील उत्तीर्ण विद्यार्थी
59 हजार 486 विद्यार्थी
सोलापूर जिल्ह्यातील उत्तीर्ण विद्यार्थी
50 हजार 768 विद्यार्थी