

पाथर्डी शहर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील इंदिरानगर भागातील अंगणवाडीची दुरवस्था झाली असून, सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या परिसराची त्वरित स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते ईजाज शेख यांनी निवेदनाद्वारे नगरपरिषदेकडे केली आहे.
मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या अंगणवाडीमध्ये इंदिरानगरसह शिवशक्तीनगर, पालवेवस्ती आदी भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र, अंगणवाडी परिसरात नेहमीच घाणीचे साम्राज्य असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना नेहमी दुर्गंधीचा मोठा सामना करावा लागतो. तसेच, या ठिकाणी मद्यपी दारू पिऊन धिंगाणा घालतात.
रिकाम्या दारुच्या बाटल्या फोडत असल्याने याचादेखील विद्यार्थी, पालक व शिक्षकांना त्रास होतो. नगरपरिषदेने तत्काळ स्वच्छता करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शेख म्हणाले, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असल्याने नगरपरिषदेने नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे. महिना-महिना याठिकाणी नगर परिषदेच्या आरोग्य कर्मचार्यांकडून सफाई होत नाही. यापुढे या ठिकाणी व्यवस्थित सफाई न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. निवेदनावर अंगणवाडी सेविका स्वाती सोनवणे, अश्विनी बोंदुल, शैलेश उगार, कैलास जठार, समीर शेख, बाबू धोत्रे फिरोज मणियार, संतोष अंतरकर, महेंद्र दिनकर, सचिन तरटे, संदीप काळोखे, लखन शेख आदींच्या सह्या आहेत.