

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा
राहाता तालुक्यातील नांदूर येथे 29 मे 2022 रोजी कृषी प्लस फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या कांदा खरेदी व साठवणूक विभागाचा शुभारंभ प्रभात उद्योग समूह व किसानकनेक्टचे चेअरमन सारंगधर निर्मळ यांच्या हस्ते करण्यात आला. कृषी प्लस फार्मर प्रोड्युसर कंपनीची सुरुवात ऑकटोबर 2020 मध्ये करण्यात आलेली असून सदर कृषी प्लस फार्मर प्रोड्युसर कंपनीचे 350 शेतकरी सभासद आहेत.
तसेच संचालक मंडळात किशोर ढोकचौळे, समीर बोर्डे, विशाल शेडगे, विश्वजित सिंग, रोहिणी ढोकचौळे, पुनम विघावे यांचा समावेश आहे. कंपनी सुरु झाल्यापासून सोयाबीन, मका, कापूस, पशुखाद्य, कांदा यामध्ये उलाढाल करत आहे. उद्घाटन केलेल्या साठवणूक केंद्रात लवकरच नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्याची सुरुवात करणार असल्याची माहिती कृषी प्लस फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक किशोर ढोकचौळे यांनी प्रास्तविक करताना दिली.
उद्घाटनप्रसंगी सारंगधर निर्मळ यांनी लॉकडाऊन सारख्या महामारीच्या कार्यकाळात सुरु करण्यात आलेल्या या कृषी प्लस उद्योग समूहाचे कौतुक केले. तसेच त्यांनी सुरु केलेले कांदा खरेदी व साठवण केंद्रांचे फीत कापून उद्घाटन केले. कार्यक्रम प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, शेतकर्यांनी एकत्र येऊन सुरु केलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे कार्य बघता शेतकर्यांचा विकास होणे शक्य असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
लॉकडाऊन सारख्या कार्य काळात शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतकर्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे महत्वाचे योगदान दिलेले असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रम प्रसंगी कोपरगाव येथील चौरंगीनाथ अॅग्रो कंपनीचे चेअरमन आयुब शेख, निर्मळ महिला नागरी सहकारी संस्थेच्या चेअरमन निशाताई निर्मळ ,अरविंद निर्मळ, नांदूर ग्रामपंचायत सरपंच विशाल गोरे, सनफ्रेशचे अध्यक्ष अमोल आरंगळे आदी उपस्थित होते.