आपत्तीकाळात प्रशासनाने सतर्क रहावे : ना. शंभूराज देसाई

आपत्तीकाळात प्रशासनाने सतर्क रहावे : ना. शंभूराज देसाई

सणबूर : पुढारी वृत्तसेवा
पाटण तालुक्यासह कराड तालुक्यातील सुपने मंडलाला प्रतिवर्षी अतिवृष्टीच्या काळात आपत्तीचा सामना करावा लागतो. आपत्ती आल्यानंतर तातडीने उपाययोजना करण्यासाठी नियोजन करा. आपत्तीच्या काळात तालुका प्रशासनाने हलगर्जीपणा करू नये, अशा सूचना ना. शंभूराज देसाई यांनी दिल्या.

ना. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली दौलतनगर येथे आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक नियोजनासंदर्भात बैठक झाली. यावेळी पाटणचे प्रातांधिकारी सुनील गाडे, कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलिस उपाधीक्षक विवेक लावंड, तहसिलदार रमेश पाटील, कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता एन. टी. पोतदार, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता बुंदेले कराडचे गटविकास अधिकारी यू. व्ही. साळुंखे, पाटणचे शेलार, पाटणचे पो. नि. एन. चौखंडे, उंब्रजचे अजय गोरड, मल्हारपेठचे उत्तम भापकर ढेबेवाडीचे संतोष पवार, कृषी अधिकारी सुनील ताकटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

ना. शंभूराज देसाई म्हणाले, कोयना धरण व्यवस्थापनाने योग्य नियोजन करावे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली तहसील कार्यालय याठिकाणी 24 तास आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात यावा. आपत्ती काळात तालुक्यामध्ये कोणत्याही ठिकाणी काही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ या कक्षामध्ये माहिती देण्याचे काम अधिकारी यांनी करून यावर तोडगा काढावा. तहसीलदार यांनी मंडलाधिकारी, तलाठी यांचेमार्फत कोयना नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना कराव्यात.

डोंगरी भागामध्ये साथीच्या रोगाबरोबर सर्पदंशाचे प्रमाण मोठया प्रमाणात पाहावयास मिळत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय याठिकाणी औषधसाठा उपलब्ध करावा. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी योग्य नियोजन करून 24 तास अलर्ट राहवे. आपत्तकाळात रुग्णवाहिकेची व्यवस्था तत्काळ कशी होईल, याची दक्षता घ्यावी.

पाऊस काळात वीज पुरवठा सुरळीत कसा राहील, याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी दळणवळणाचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना ना. देसाई यांनी केल्या. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने अतिवृष्टीच्या दरम्यान नदीकाठचे व डोंगर भागातील पिण्याच्या पाण्याचे उदभव व विहिरी पाण्याखाली गेल्यास टँकरची व्यवस्था करून पाणी पुरवठा करावा, अशा सूचना केल्या.

धोकादायक शाळेत विद्यार्थी बसवू नये

गटशिक्षण अधिकारी यांनी प्राथमिक शाळांची पाहणी करून आपत्तीकाळात तात्पुरता निवार्‍याकरिता शाळा सुस्थितीत आहेत का ते पहावे. धोकादायक व मोडकळीस आलेल्या शाळांमध्ये अतिवृष्टीच्या कालावधीत मुलांना बसवू नये, अशा सूचना ना. शंभूराज देसाई यांनी अधिकार्‍यांना केल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news