नगर : सरपंचाच्या पतीला मारण्याची सुपारी; हल्लेखोर जेरबंद

File Photo
File Photo

वाळकी, पुढारी वृत्तसेवा : रिसॉर्टची ग्रामपंचायत दप्तरी नोंद लावून मालमत्ता कर भरण्यासाठी ग्रामसभेत ठराव घेण्यात आल्याचा रागातून, महिला सरपंचाच्या पतीला मारण्याची सुपारी देत गुंडांकडून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना नगर तालुक्यातील देवगाव येथे घडली आहे. यातील एका हल्लेखोराला पोलिसांनी पकडल्यानंतर या खळबळजनक घटनेचा खुलासा झाला आहे.

नगर तालुक्यातील देवगावची ग्रामसभा दि.8 ऑगस्ट रोजी झाली होती. या ग्रामसभेत ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या देवदरी रिसॉर्ट हॉटेलची नोंद लावून ग्रामपंचायत कर भरण्यासाठी ठराव घेण्यात आला होता. त्याबाबत ग्रामसेवक अरविंद शेळके यांनी रिसॉर्टचे मालक विठ्ठल तुकाराम वामन यांना नोटीस बजावली होती. त्याचा राग मनात धरून विठ्ठल वामन याने ग्रामसेवक शेळके यांच्याजवळ महिला सरपंचांचे पती संभाजी शिवाजी वामन यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.

दुचाकीवर गाठून हल्ला

संभाजी शिवाजी वामन हे दि.17 ऑगस्ट रोजी ते काम करीत असलेल्या राजीव गांधी पतसंस्थेच्या दिल्लीगेट शाखेतून दुचाकीवरून देवगावकडे जात होते. यावेळी पाठीमागून मोपेडवर आलेल्या तीन अनोळखी इसमांनी वामन यांना अडवून त्यांच्यावर लाकडी दांडक्यांनी हल्ला केला. यामध्ये त्यांचे दोन्ही पाय व एक हात फ्रॅक्चर झाला असून, झटापटीत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व खिश्यातील 10 हजार रूपये गहाळ झाले. गर्दी जमा होऊ लागल्याने हल्लेखोर तेथून पळून गेले. याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात 21 ऑगस्ट रोजी जखमी वामन यांच्या दवाखान्यातील जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरचा गुन्हा हा अविनाश बाळासाहेब ठोंबरे (रा.सिद्धार्थनगर, नगर), वीर दीपक सोनवणे (रा.रंगभवन, शंकर मंदिराजवळ, सर्जेपुरा,नगर) यांनी केल्याची पोलिसांना खात्री झाली. त्यानंतर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याची दोन पथके आरोपींचा शोध घेत होते. यातील अविनाश बाळासाहेब ठोंबरे यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात राहुल उर्फ बंडू उक्कम घोरपडे व बच्चू काते (दोघे रा. सिद्धार्थनगर, नगर) हे दोघेही असल्याचे त्याने सांगितले. तसेच, विठ्ठल तुकाराम वामन याच्याकडून 50 हजार रूपयांची सुपारी घेऊन, संभाजी वामन यांच्यावर हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे.

अविनाश ठोंबरे अटक करण्यात आली असून, वाढीव कलम लावण्यात आले आहे. ठोंबरे यास न्यायालयाने दि. 29 ऑगस्ट पोलिस कोठडी दिली आहे. उर्वरित आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. सदरची कारवाई भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, उपनिरीक्षक एम. के. बेंडकोळी, पोहेकॉ गोविंद गोल्हार, गोपीनाथ गोर्डे, पोना गणेश साठे, राहुल द्वारके, भानुदास खेडकर, रघुनाथ कुलांगे, अरूण मोरे, अविनाश कराळे, रमेश दरेकर, समीर शेख, अमोल आव्हाड, केतन पटेकर यांनी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news