

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार जलवाहिन्या फुटल्याने बुर्हाणनगर पाणी योजनेतून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. याचा फटका 42 गावांमधील नागरिकांबरोबरच आता पंढरपूरकडे पायी चाललेल्या दिंडीतील वारकर्यांनाही बसू लागला आहे. वारकर्यांसाठी पाण्याची व्यवस्था करताना नगर-सोलापूर महामार्गावरील गावांतील ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे.
बुर्हाणनगर पाणी योजनेची पाईपलाईन ही नगर-सोलापूर महामार्गावरील नगरपासून 25 किलोमीटरवर असणार्या रुईछत्तीशी गावापर्यंत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या पाईपलाईनमधून येणारे पिण्याचे पाणी बंद झाल्याने तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच आता पंढरपूर यात्रा सुरू झाली आहे. त्यामुळे पंढरपूरला जाणार्या दिंड्या या मोठ्या प्रमाणात या नगर-सोलापूर महामार्गावरून जातात. या दिंड्यांमध्ये लाखो वारकरी सहभागी होत असतात. त्यांची जेवण-पाण्याची सोय ज्या मार्गावरुन दिंडी जाते, त्या मार्गावरील रहिवासी करत असतात. मात्र, नगर-सोलापूर महामार्गावरील बुर्हाणनगर पाणी योजनेतून पाणीपुरवठा होणार्या गावांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यांची पिण्याच्या पाण्यासाठी तारांबळ होत आहे.
एकीकडे कुटुंबाच्या पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असतानाच, आता वारकर्यांच्या पाण्याची सोय करण्यासाठी त्यांना पिण्याचे पाणी विकत आणावे लागत आहे. प्रशासनाने या भागासाठी गेल्या दोन महिन्यापासून एकही टँकर दिलेला नाही आणि या भागातील लोकांसाठी काही दखल घेतली नाही. जिल्हा प्रशासनाने तातडीने बुर्हाणनगर पाणी योजनेचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.