पाथर्डी तालुका, पुढारी वृत्तसेवा : मुळा पाटबंधारे विभाग अंतर्गत मुळा उजवा कालवा पाथर्डी शाखा कालवा व अंतिम वितरिकेच्या विशेष दुरुस्तीसाठी 18 कोटी 72 लक्ष किंमतीच्या कामासाठी शासन निर्णय झाला असून, शासनाच्या जलसंपदा विभागाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे, अशी माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.
जलसंपदा विभागाच्या दि. 26 व 27 जुलैच्या शासन निर्णयानुसार मुळा उजवा कालवा पाथर्डी शाखा सा. क्र.25 कि.मी. ते सा.क्र.43 कि.मी. व वितरिका क्र.2 वरील कामासाठी 4 कोटी 70 लक्ष 76 हजार रुपये, मुळा उजवा कालवा अंतिम वितरिकेच्या विशेष दुरुस्तीसाठी 4 कोटी 38 लक्ष 84 हजार रुपये, पाथर्डी शाखा कालवा अंतिम वितरिका व वितरिका क्र.3 कालवा दुरुस्तीसाठी 4 कोटी 58 लक्ष 76 हजार रुपये, पाथर्डी शाखा कालवा सा.क्र. 0 कि. मी. ते सा.क्र. 25 कि.मी. व वितरिका क्र.1 वरील कालवा दुरुस्तीसाठी 4 कोटी 64 लाख रुपये, पाथर्डी शाखा कालवा सा.क्र. 18/280 कि. मी. ते सा.क्र. 18/580 कि.मी. वरील कालवा दुरुस्तीसाठी 40 लक्ष 33 हजार रुपये, असा एकूण 18 कोटी 72 लाख रुपयांच्या कामांसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
कालव्यावरील बांधकामे, अस्तरीकरण, भराव मजबुतीकरण ही कामे करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे सन 2010 पासून आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात कालवा दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला नव्हता. या सर्व कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार राजळे यांनी त्यांचे मानले. कालवा दुरुस्तीच्या कामांना मोठा निधी मिळाल्याने पाटपाणी लाभक्षेत्रातील पाटपाणी वितरणातील समस्या दूर होणार असल्याने लाभार्थी शेतकर्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजप -शिंदेचे सरकार आल्यापासून मतदारसंघातील विकासकामांना, तसेच प्रलंबित कामांना मोठ्या प्रमाणात निधी मिळत आहे. मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण प्रयत्नशील असून, त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार राजळे यांनी सांगितले.