नगर : नान्नज-जामखेड रस्ता ठरतोय जीवघेणा!

नान्नज : जामखेड रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा होतोय. (छाया : लियाकत शेख)
नान्नज : जामखेड रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा होतोय. (छाया : लियाकत शेख)
Published on
Updated on

नान्नज, पुढारी वृत्तसेवा : नान्नज-जामखेड या 18 किलोमीटर अंतर असणार्‍या रस्त्यामधील चुंबळी ते झिक्री गावादरम्यान असणार्‍या सात किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली असून, वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावीत, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांनी केली.

नान्नज-जामखेड रस्त्यामधील झिक्री ते चुंबळी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, रस्त्याच्या साईड पट्ट्या गवतात झाकले गेल्याने रस्ता दिसेनासा झाला आहे. झिक्रीतून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असणार्‍या पठाण वस्तीजवळ रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना येथे मोठी कसरत करावी लागते. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे लहान-मोठे अपघात झाले असून, यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. राजेवाडी फाट्याजवळील मातोश्री मंगल कार्यालया जवळ असणार्‍या पुलावर मोठा खड्डा पडल्याने येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

सरदवाडी फाट्याजवळील दोन्ही बाजूच्या पुलावर खड्डे पडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. नान्नज-जामखेड रस्ता सध्या खड्ड्यात गेल्याने अपघातांचे प्रमाण वाढले. नान्नज गावापासून राजेवाडीपर्यंत चार किलोमीटर रस्त्याचे काम एका ठेकेदाराने, तर धोंडपारगाव ते झिक्रीपर्यंत चार किलोमीटर अंतराचे काम दुसर्‍या ठेकेदाराने केले.

या दोन्ही ठेकेदारांनी तीन-चार महिन्यांपूर्वी केलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अत्यंत घाई गडबडीत पूर्ण केल्याने हे कामही जागोजागी उचकटले आहे. रस्त्याच्या दोन्ही साईटपट्ट्या गवताखाली गेल्याने वाहनधारकांसह नागरिकांना रस्ता दिसेनासा झाला आहे. साईट पट्ट्यावर तीन ते चार फुटांचे गवत उगवल्याने रस्ता अरुंद झाला असून, नान्नज-जामखेड हा रस्ता खड्ड्यात गेल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावीत, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news