नगर : दोन लाख भाविक चांगदेवांच्या चरणी लिन

पुणतांबा : आषाढी एकादशी निमित्ताने महंत रामगिरीजी महाराज यांच्या किर्तनासाठी उपस्थित भाविक. छाया : श्रीरंग गोर्‍हे
पुणतांबा : आषाढी एकादशी निमित्ताने महंत रामगिरीजी महाराज यांच्या किर्तनासाठी उपस्थित भाविक. छाया : श्रीरंग गोर्‍हे
Published on
Updated on

पुणतांबा, पुढारी वृत्तसेवा : कामिका आषाढी एकादशी निमित्ताने काल सुमारे दोन लाख भाविकांनी योगीराज चांगदेव महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेतले. मागील दोन वर्ष कोरोनामुळे रद्द असलेला यात्रोत्सव यंदा प्रथमच तीन दिवस भरणार आहे. यामुळे गर्दीचा उच्चांक झाला. शनिवारपासून दिंड्यांमुळे विठ्ठल नामाच्या गजराने मंदिर परिसर व सर्व रस्ते दुमदुमून गेले होते.

दरम्यान, श्रावण पंचमीपासून सुरू होणारा राज्यात प्रसिद्ध असलेला यंदाचा 175 वा सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह कोकमठाण (ता. कोपरगाव) येथे होणार असल्याचे सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी किर्तनानंतर जाहीर केले.
पहिल्या आषाढी एकादशीला पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनानंतर धाकट्या एकादशीला चांगदेवाच्या दर्शनाने आषाढवारी पूर्ण होते, अशी वारकर्‍यांमध्ये भावना व आख्यायिका सांगितली जात असल्याने या एकादशीला भाविक येथे दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. पावसाने सुरूवातीपासून समाधानकारक हजेरी लावली असल्याने भाविकात उत्साह दिसत होता.

पहाटे तीन वाजता विठ्ठल रखुमाई, चांगदेव महाराज मुर्तीस अभिषेक महापूजा करण्यात येऊन मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले. गोदावरीत पवित्र स्नानाची पर्वणी साधुन भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सकाळी सातनंतर गर्दीत वाढ होत गेल्याने मंदीरापासून एक कि. मी. पर्यंत लागलेल्या रांगा सायंकाळी उशिरापर्यंत होत्या.

खासगी प्रवासी वाहतूकी बरोबर श्रीरामपूर, कोपरगाव आगाराने जादा बस यात्रेनिमित्त सोडल्या होत्या. रेल्वे फाटक वारंवार बंदमुळे होणारी अडचण, वाहनांची गर्दी, एकेरी रस्ता यामुळे वाहतुकीस खोळंबा होत असला तरी पोलिस, रेल्वे प्रशासन यांच्या नियोजनामुळे फारशी अडचण झाली नाही. अनिरुद्ध बापू अ‍ॅकडमीच्या 100 स्वंयसेवकांनी भाविकांच्या गर्दीवर नियोजनासाठी पोलिसांना सहकार्य केले.

यावर्षी 175 वा गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह दि. 2 ते 9 ऑगस्ट या कालावधीत कोकमठाण येथे होणार असल्याचे महंत रामगिरी महाराज यांनी जाहीर केले. यावेळी रामगिरी महाराज यांचे कीर्तन झाले. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, सरपंच डॉ. धनंजय धनवटे, उपसरपंच महेश चव्हाण, धनंजय जाधव, सोसायटीचे अध्यक्ष सुधाकर जाधव, दिनकर भोरकडे, विजय धनवटे, बंडु साबळे, सप्ताह कमिटीचे संभाजी रक्ताटे शरद रोहोम, केशव मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणतांब्यात शेकडो दिंड्यांचे आगमन

काशी विश्वनाथ, दत्तात्रेय, सोमेश्वर तसेच मुक्ताई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. नगर, औरंगाबाद, नाशिक जिल्ह्यांतील अनेक गावातून शेकडो पायी दिंड्या एकादशीच्या दुपारपर्यंत येत होत्या. यामुळे पुणतांब्यास जोडणारे रस्ते भगव्या पताका, टाळ मृदंग व विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेले होते. विविध संघटना, मंडळाच्या वतीने दिंड्यातील भाविकांना फराळाचे वाटप करून स्वागत करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news