नगर : टोळीप्रमुखासह दोघे जिल्ह्यातून हद्दपार

नगर : टोळीप्रमुखासह दोघे जिल्ह्यातून हद्दपार

राशीन : पुढारी वृत्तसेवा : कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीसह परिसरात आपल्या टोळीचे वर्चस्व कायम रहावे व सर्वसामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करण्यासाठी घातक हत्यारांसह दरोडा, जबरी चोर्‍या,लोखंडी रॉड तलवारीने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या तालुक्यातील एका टोळी प्रमुखासह त्याच्या सहकार्‍यांला कर्जत पोलिसांनी जिल्ह्यातून दोन वर्षे हद्दपार केल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

पप्पू उर्फ राहुल बाळासाहेब कदम (वय 28, रा. परिटवाडी, ता.कर्जत) व शक्ती उर्फ विशाल अशोक अडसूळ (वय 27, रा. राशीन, तालुका कर्जत) अशी या दोघांची नावे आहेत. त्यांची तालुक्यात एक टोळी सक्रिय असून, या टोळीकडून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. याबाबत कर्जत पोलिसांनी त्यांच्यावर वारंवार कायदेशीर व प्रतिबंधात्मक कारवाया केल्या. मात्र त्यांच्यात अजिबात सुधारणा झाली नाही.

त्यामुळे त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस निरीक्षक यादव यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्यामार्फत पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना पाठविला होता. त्यांनी प्रकरणाची सविस्तर चौकशी केली. त्यानंतर संबंधित गुन्हेगारांनी वकिलामार्फत बचावाचे लेखी म्हणणे सादर केले होते. मात्र, पोलिस अधीक्षक पाटील यांनी टोळीवरील दाखल गुन्हे लक्षात घेऊन त्यांच्या हद्दपारीचा आदेश काढला.

सदर आरोपींना काल रोजी जिल्ह्याबाहेर सोडण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक भगवान शिरसठ, हेड कॉन्स्टेबल तुळशीदास सातपुते, संभाजी वाबळे, भाऊ काळे, संपत शिंदे, ईश्वर माने, मनोज लातूरकर, सचिन वारे यांनी केली.

logo
Pudhari News
pudhari.news