

बोधेगावः पुढारी वृत्तसेवा: शेवगाव- गेवराई मार्गावर राक्षी गावानजीक पेट्रोल पंपासमोर एसटी बस आणि माल वाहतूक टेम्पोमध्ये जोरदार धडक होवून झालेल्या अपघातात टेम्पो चालकाचा जामीच मृत्यू झाला आहे. हा अपघात आज सकाळी दहा ते सव्वा दहा वाजण्याच्या दरम्यान झाला; तर एसटी बसमधील सहा प्रवासी जखमी झाले आहेत. जावेद शेख (वय 35, रा. मालेगाव खुर्द, ता. गेवाराई, जि. बीड), असे मृतचालकाचे नावा आहे.
राज्य परिवहन महामंडळाची यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आगाराची एसटी बस (एम.एच. 40 वाय 5571) अहमदनगर- पुसद बस नगरवरून शेवगाव- गेवराईमार्गे पुसदकडे निघाली होती. गेवराई येथील टेम्पो (एमएच 08 डब्लू 1471) हा फळे, भाजीपाला वाहतूक करणारा टेम्पो रिकामे कॅरेट घेवून नगरकडे जाताना आज सकाळी दहा ते सव्वा दहाच्या दरम्यान शेवगाव तालुक्यातील राक्षी गावानजीक पेट्रोल पंपाजवळ समोरासमोर धडक झाली.
यात टेम्पोचा चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर एसटी बसचा चालक भोपासिंग जानुसिंग पवार (वय 40) आणि चालकाशेजारी बसलेला प्रवासी आकाश भगवान रोटे (वय 30, रा. बीबी, ता. लोणार, जि. बुलढाणा) दोघे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आकाश रोटे यांना पुढील उपचारासाठी नगरला रवाना केले आहे. दरम्यान एसटी बसमध्ये 12 प्रवासी होते. सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती बसचे वाहक संतोष सीताराम आढाव याने दिली. या अपघातात टेम्पोच्या पुढील भागाचा चुराडा झाला. टेम्पो चालकाचा मृतदेह त्यात अडकला होता.
बसच्या चालकाचे प्रसंगावधान
बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले, असेच म्हणावे लागेल. घटनास्थळापासून रस्त्याच्या डाव्या बाजूला जवळपास 100 मीटर अंतरावर विजेचा खांब चुकवून चालकाने वेगावर ताबा मिळवत बस थांबवली.