नगर : आयडीबीआय बँकेला लाखोंचा गंडा

नगर : आयडीबीआय बँकेला लाखोंचा गंडा

Published on

काष्टी, पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे बुद्रूक येथील सात जणांनी संगनमताने शेतीचे बनावट सातबारा उतारे, फेरफार, तसेच खोटे दस्त तयार करून श्रीगोंदा शहरातील आयडीबीआय बँकेकडून 25 लाख 61 हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात बँकेचे व्यवस्थापक अजय पोपट दानवे यांच्या फिर्यादीवरून सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी यातील अंकुश जालिंदर वैद्य आणि महेश सोपान राऊत यांना अटक केली आहे.

श्रीगोंदा शहरातील आयडीबीआय बँकेकडून तालुक्यातील पिसोरे बुद्रूक येथील अंकुश जालिंदर वैद्य याने 4 लाख 60 हजार रुपये, जालिंदर खंडू वैद्य याने 2 लाख रुपये, वैभव दादा थोरात याने 3 लाख रुपये, सोपानदादा राऊत याने 3 लाख रुपये, चंद्रकला शिवाजी राऊत हिने 4 लाख 95 हजार रुपये, महेश सोपान राऊत याने 3 लाख 11 हजार रुपये, मीना सोपान राऊत हिने 4 लाख 95 हजार रुपये, असे एकूण 25 लाख 61 हजार रुपये पीक कर्ज सन 2017 ते 2018 या कालावधीत घेतले होते. त्यांनी एकही हप्ता न भरल्याने हे पीक कर्ज थकीतमध्ये गेले.

त्यामुळे बँकेचे शाखाधिकारी अजय दानवे यांनी डिसेंबर 2021 मध्ये थकीत कर्जाच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यामध्ये त्यांना या कागदपत्रात शेतीचे खोटे सातबारा उतारे, फेरफार, तसेच खोटे दस्त दिल्याचे दिसून आले. त्यांनी बँकेचे अधिकृत वकील सुभाष संभाजी बोरुडे यांच्यामार्फत पीक कर्ज तसेच त्यावरील व्याज भरण्यासाठी 21 मार्च 2022 रोजी अधिकृत नोटीस पाठविली. या नोटिसीला कोणतेही उत्तर न मिळाल्याने शाखाधिकारी दानवे हे आपल्या सहकार्‍यांसह वसुलीसाठी संबंधितांकडे गेले असता, त्यांनी कर्ज भरण्यास नकार दिला. त्यामुळे या 7 जणांवर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अंकुश जालिंदर वैद्य आणि महेश सोपान राऊत या दोन जणांना पोलिसांनी अटक केले असून, इतर 5 जण पसार झाले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामराव ढिकले करत आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news