गॅस पाईपलाईन कामाविरोधात नागरिकांची पोलिसात धाव

जेऊर : पोलिसांना निवेदन देताना रामेश्वर निमसे, शुभांगी शिकारे, किशोर शिकारे, भीमराज मोकाटे, संतोष पटारे आदी.
जेऊर : पोलिसांना निवेदन देताना रामेश्वर निमसे, शुभांगी शिकारे, किशोर शिकारे, भीमराज मोकाटे, संतोष पटारे आदी.

जेऊर : पुढारी वृत्तसेवा

नगर-औरंगाबाद महामार्गालगत सुरू असलेल्या गॅस पाईपलाईनच्या ठेकेदाराने मनमानी करत वृक्षांची कत्तल, रस्त्यावर वाहने, विद्युत वाहिन्यांचे नुकसान केले असून, सरपंचाने एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांना निवेदन देऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

नगर-औरंगाबाद महामार्गावर गॅस पाईपलाईनचे काम सुरू आहे. या विरोधात शेतकर्‍यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. संबंधित ठेकेदाराने मनमानी काम केले असून, शेतकरी, व्यावसायिक, धार्मिक स्थळे, तसेच परिसरातील विविध पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. रस्त्यावर मधोमध वाहने लावून काम केले जाते.

ठेकेदाराचे काम काही नागरिकांनी बंद पाडले होते, तरी ठेकेदाराने इमामपूर परिसरात काम सुरू ठेवले. अर्जुन टिमकरे यांचे कंपाउंड तोडून मोठे नुकसान केले असल्याची माहिती टिमकरे यांनी दिली. पुलांचे नुकसान करण्यात आल्याने पावसाळ्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

या मनमानी कामाविरोधात शेतकरी, व्यावसायिकांनी विरोध केला होता. धनगरवाडी, वाघवाडी येथील युवकांचा पाईपलाईनच्या कामामुळे अपघातात मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे युवकांच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

कोणत्याही परिस्थितीत काम होऊ देणार नसल्याचा पवित्रा सरपंचाचे शिष्टमंडळाने घेतला आहे. अगोदर नुकसान झालेल्या शेतकरी, व्यावसायिक, अपघातात बळी गेलेल्या युवकांना मदत मिळावी, तसेच संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पोखर्डीचे सरपंच रामेश्वर निमसे, धनगरवाडीचे सरपंच शुभांगी शिकारे, किशोर शिकारे, इमामपूरचे सरपंच भीमराज मोकाटे, डोंगरगणचे उपसरपंच संतोष पटारे आदी उपस्थित होते.

पाहणी करून कारवाई करणार
संबंधित कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांचे झालेले नुकसान व अन्य बाबींची पाहणी करून पुढील कारवाई करण्यात येईल. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी कामाच्या गलथान कारभाराबाबत संबंधित ठेकेदाराला चांगलेच फैलावर घेतले. सरपंचांच्या शिष्टमंडळाला ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आठरे यांनी दिले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news