अकोले : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील कोतूळ पुलाच्या भरावासाठी ठेकेदाराकडून अवैध उत्खनन सुरू असल्याबाबत दैनिक 'पुढारी' ने वृत्त प्रकाशित करताच अकोल्याचे तहसीलदार सतीश थेटे यांनी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात अकोल्याचा महसूल विभाग ठेकेदारावर दंडात्मक कारवाई कधी करणार? असा प्रश्न जनसामान्यात उपस्थित होत आहे.
अकोले तालुक्यातील मुळा नदीवर कोतूळ पुलाचे काम सुरू आहे. सध्या या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे पुलाच्या ठेकेदाराकडून एका खासगी क्षेत्रातून माती मुरमाचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू आहे. ही माती व मुरूम पुलाच्या खाली भरावा म्हणून टाकण्यात येत आहे. सध्या पुलाच्या खाली या मुरुमाच्या वीस ते पंचवीस फुटापर्यंत गंज लागला आहे.
हजारो ब्रास माती आणि मुरमाचे अवैद्य उत्खनन या ठेकेदाराने केले आहे.तर महसूल विभागाला रॉयल्टी न भरता विनापरवाना हे उत्खनन सुरू असल्याचे दिसत आहे. दैनिक 'पुढारी' ने याबाबत वृत्त प्रकाशित केले असता अकोल्याचे तहसीलदार सतीश थेटे यांनी मंडल अधिकारी व तलाठी यांना संबंधित माती मुरुमाच्या उत्खननाचा पंचनामा करण्याचा आदेश दिला.
मात्र प्रत्यक्षात महसूल विभागाने किती ब्रासचा पंचनामा केला याची माहिती तहसीलदारांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली नाही. मी संबंधित ठेकेदाराला नोटीस पाठविणार आहे. इतकच तहसीलदार सतीश थेटे यांनी सांगितले. मात्र या नोटिशी द्वारे संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून त्यास रॉयल्टी भरण्यास भाग पाडणार का.? ही केवळ कारवाईचा आव आणणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
तहसीलदार यांनी उत्खननचा केलेला पंचनामा तसेच ठेकेदाराला कोणत्या स्वरूपाची नोटीस बजावली याची माहिती माध्यमांना देणे गरजेचे आहे. तसेच अनधिकृतपणे गौणखनिज घेऊन जाणार्यांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल तर बुडतोच, शिवाय निसर्गाचाही र्हास होत आहे. त्यामुळे एसडीपीओ व तहसीलदार हे पोलिसांच्या मदतीने अनधिकृतरित्या खनिज घेऊन जाणार्यांवर कारवाई करतात.
परंतु कोतूळ परिसरात करण्यात आलेल्या उत्खनन हजारो ब्रास इतका आहे. त्यामुळे ठेकेदाराकडून रॉयल्टी भरून घेतल्यास अकोले महसूल विभागाला कोट्यवधी रुपयांचा वसुली प्राप्त होणार आहे. मात्र त्यासाठी अकोले महसूल विभागाने कोणत्याही दडपणाला बळी न पडता निसंकोचपणे ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करुन महसूल प्राप्त करण्याची आवश्यकता आहे.
महसूल विभागाचे उत्खननाला अभय
अकोले तालुक्यातील कोतुळ परिसरात मोठ्या प्रमाणात मुरूम तसेच मातीचे उत्खनन सुरू आहे. बांधकाम व इतर कारणांसाठी मुरूम व मातीचे उत्खनन करण्यासाठी परवानगीची गरज आहे. मात्र, विनापरवाना मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी खोदाई करून सर्रासपणे मुरुमावर डल्ला मारला जात आहे.
महसूल विभागात संबंधीतांची उठबस असल्यामुळे तसेच राजकीय पाठबळामुळे अनेकवेळा कारवाईचा हात बेकायदेशीररीत्या उत्खनन करणार्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष घालून बेकायदेशीर उत्खनन रोखण्याची आवश्यकता आहे.