वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर-पुणे महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून, रविवारी (दि.4) सकाळी सहा वाजता कामरगाव शिवारात स्माईल स्टोन हॉटेलजवळ भरधाव वेगातील कार पुलावरील कठडा तोडून खाली कोसळली. या अपघातात एकाच कुटुंबातील दोन लहान मुलांसह पाच जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्या सर्वांवर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुळचे अमरावती येथील राहणारे आणि नोकरीनिमित्त रामनगर, हवेली, पुणे येथे राहणारे पोकळे कुटुंबीय पुण्याहून अमरावतीकडे जात होते. सकाळी सहाच्या सुमारास कामरगाव शिवारात स्माईल स्टोन हॉटेलजवळ असलेल्या वळणावर कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या कठड्याला जोरात धडकली.
त्यात पुलाचा कठडा तुटला व कार पुलावरून खाली 20 ते 25 फूट कोसळली. सुदैवाने पुला खाली झाडेझुडूपे असल्याने कार त्यांना अडकत खाली जाऊन आदळली. कार खाली कोसळल्यावर तेथे मोठा आवाज झाला. आवाज ऐकून आसपासच्या व्यावसायिकांनी सिद्धांत आंधळे यांना घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सहकारी, तसेच परिसरातील नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या पाचही जणांना बाहेर काढले. रुग्णवाहिकेतून त्यांना उपचारासाठी नगरच्या खासगी रुग्णालयात हलविले. हा अपघात अतिशय भीषण होता. कारची अवस्था पाहून त्यातून सर्वजण बचावले हे मोठे सुदैव आहे; मात्र यातील दोघांना गंभीर स्वरूपाची इजा झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सिद्धांत आंधळे यांनी प्रसंगावधान दाखवत अपघातग्रस्तांचे प्राण वाचविले. या महामार्गावर सातत्याने अपघात होत असून, चास – कामरगाव परिसरात राज्य शासनाने तातडीने एक ट्रॉमा केअर सेंटर उभारावे, अशी मागणी आंधळे यांनी अनेकदा केली आहे. या संदर्भात येत्या 1-2 दिवसांत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.