कोंभळी : पुढारी वृत्तसेवा : गावात दहशत निर्माण करण्यासाठी धारदार कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करणे व त्यानंतर तो कोयता बाळगल्याचे प्रकरण तालुक्यातील चांदे बुद्रुक येथील एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आले आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल त्याच्याकडून केक कापण्यासाठी वापरण्यात आलेला धारधार कोयता पोलिसांनी जप्त केला आहे.
ऋषिकेश भाऊसाहेब गावडे (वय 21) असे या बर्थ डे बॉयचे नाव आहे.त्याने वाढदिवसाला मित्रांना बोलावून राहत्या घरी चक्क धारदार कोयत्याने केक कापला. त्यानंतर बर्थ डे बॉयने तोच कोयता घेऊन कोणाला गळ्याला लावून तर कोणाच्या गळ्यावर वेगळ्या स्टाईलने पकडून नागरिकांच्या मनात भीती निर्माण होईल, अशा पद्धतीने फोटो काढून समाजमाध्यामांवर प्रसारित केले आणि कोयता बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर कर्जत पोलिस ठाण्यात तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानंतर पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलिस नाईक शाम जाधव, सुनील खैरे, गोवर्धन कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित तरुणाच्या कोयता ठेवलेल्या गाईच्या गोठ्यात भेट दिली. या बर्थ डे बॉयवर कर्जत पोलिसांनी शस्त्र अधिनियम कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
भाईगिरी, दहशत आदी गैरप्रकारांमध्ये युवा पिढीने अडकू नये. नागरिकांना धमकावण्यासाठी व त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी मोठी गर्दी करून शस्त्रांचा वापर करून अशा घटना घडविल्या जातात. मात्र, अशा प्रकारांवर कर्जत पोलिसांचा 'वॉच' आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर संबंधिताची व कुटुंबाची बदनामी होते. त्यामुळे युवकांनी अशा चुकाच करू नयेत, असे आवाहन पोलिस निरीक्षक यादव यांनी केले आहे.