दोनच महिन्यांत रस्त्याची वाट! कुकाणा-घोडेगाव रस्त्यावर खड्डे

दोनच महिन्यांत रस्त्याची वाट! कुकाणा-घोडेगाव रस्त्यावर खड्डे
Published on
Updated on

कुकाणा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांना नगर किंवा पुण्याला जाण्यासाठी आवश्यक असलेला कुकाणा -घोडेगाव रस्त्याची कौठा ते देवगावपर्यंत झालेल्या कामांची दोन महिन्यातच वाट लागली आहे. नेवासा तालुक्यातील कुकाणा, वरखेड, शिरजगाव, तेलकुडगाव, देडगाव, भेंडा, जेऊर, गेवराई, वाकडी आदी गावांना पुणे, नगर तसेच महाराष्ट्रात कांद्यासाठी व जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या घोडेगाव येथे जाण्यासाठी आवश्यक व अति महत्त्वाचा असलेला कुकाणा-घोडेगाव रस्त्याचे दोन महिन्यापूर्वी कौठा ते देवगावपर्यंत काम करण्यात आले. परंतु, हे काम अति निकृष्ट दर्जाचे झाले असून, दोनच महिन्यात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अद्यापपर्यंत मोठ्या स्वरुपाचा पाऊस नसताना ही या रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर या रस्त्याने गेल्यानंतर या रस्त्याची यापेक्षाही दयनीय अवस्था होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. या रस्त्याचे अनेक ठिकाणी काम अजून अपूर्ण आहे. तसेच, यासाठी वापरण्यात आलेल्या कार्पेटमधील डांबर निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे हा रस्ता उघडला जात आहे.

चौकशी करण्याची मागणी

भविष्यात या रस्त्याची पूर्वीपेक्षाही दयनीय अवस्था होण्याची भीती अनेक वाहन चालकांनी व्यक्त केली. तरी या रस्ता कामाची संबंधित विभागाने पाहणी करून चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news