नगर : पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दोन पोलिस कर्मचार्यांना तक्रारदार यांच्याकडून एका गुन्ह्यात आरोपी न करण्याकरिता 12 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलिस ठाण्यातच नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. पोलिस हवालदार संतोष रामनाथ लांडे, पोलिस कॉन्स्टेबल राघव छबुराव कोतकर (दोघे नेमणूक कोपरगाव तालुका पोलिस ठाणे) अशी त्या दोघांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळाली माहिती अशी, कोपरगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार संतोष लांडे यांच्याकडे आहे.
या गुन्ह्यात तक्रादार यांना आरोपी न करण्यासाठी लांडे व कोतकर यांनी बोलावून घेतले आणि 15 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 12 हजार रुपये देण्याचे ठरले. गुरूवारी(दि.7) रोजी कोपरगाव पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही एनएस कक्षात तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. याबाबत कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई नाशिकचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलिस कर्मचारी प्रफुल्ल माळी, सचिन गोसावी, विलास निकम यांच्या पथकाने केली.
हेही वाचा