आ. गडाखांचा नेवाशात भाजपला पुन्हा धक्का ! | पुढारी

आ. गडाखांचा नेवाशात भाजपला पुन्हा धक्का !

सोनई : पुढारी वृत्तसेवा : राज्यात भाजपमध्ये इन्कमिंग सुरू असताना नेवाशात मात्र आमदार शंकरराव गडाख यांनी भाजपला जोरदार धक्का दिला आहे. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या होम पिचवर भाजपला खिंडार पाडले. भाजपच्या कार्यकारीणीत कायम निमंत्रित, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय काळे, देवगाव, रांजणगावदेवीचे सरपंच,भेंडा बुचे उपसरपंचांनी गडाख गटात प्रवेश केला. नेवाशात पदाधिकारी निवडीवरून भाजपातंर्गत धूसफूस सुरू असून निष्ठावातांना डावलत सोयर्‍याधायर्‍यांना पद दिल्याची चर्चा आहे.

दत्तात्रय काळे यांच्यासह उपसरपंच पंढरीनाथ फुलारी, देवगावचे सरपंच विष्णू गायकवाड, देवगावचे ग्रामपंचायतीचे सदस्य देवेंद्र काळे, रवींद्र गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, महेश गायकवाड, गणेश गायकवाड, सरपंच सोपानराव लोखंडे, तुकाराम दामोदर कोलते यांनी आ. गडाख यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेत प्रवेश केला आहे. दत्तात्रय काळे यांना भाजपची बुलंद तोफ मानली जाते. ते स्वतः जिल्हा परिषद सदस्य असून भाजपच्य जिल्हा कार्यकारणीवरदेखील आहे. काळे यांनी भाजपला ‘जय श्रीराम’ करत साथ सोडल्याने मोठा धक्का मानला जात आहे. काळे यांच्या पाठबळामुळे आ गडाख यांचे अगोदरच मजबूत असलेले संघटन आता आणखी भक्कम झाले आहे. भेंडा, कुकाणा तसेच चांदा गटात गडाख यांना या प्रवेशाचा मोठा फायदा होणार आहे.

भाजपचे माजी आमदार असलेल्या गावातील अनेकांनी यापूर्वीच भाजपला बायबाय केलेला आहे. आता दोन/चार गावचे सरपंच गडाखांच्या तंबूत सामील झाले आहे. मागील दोन वर्षापासून नेवासा भाजपला गळती लागली असून अनेकांनी आ. गडाख यांचे नेतृत्व मान्य करत त्यांच्या गटात प्रवेश केला आहे. माजी आमदार मुरकुटे यांचे सख्खे पुतणे पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे यांनी भाजप सोडल्या पाठोपाठ गेवराई,जेऊर हैबती, धनगरवाडी, खुपटी, नेवासा बु,भानसहिवरे, शनिशिंगणापूर, कुकाणा यासह अनेक गावांतील भाजपचे निष्ठावंत आ. गडाख गटात सामील झाले आहेत.

आ गडाखांकडे सत्ता नसल्याने ते काही देऊ शकत नसले तरी त्यांच्याकडे प्रवेश करण्यासाठी रिघ लागली आहे. आमदार गडाख हे शब्दाला पक्के असून यापुढे जो काही विकास होईल तो फक्त गडाखच करु शकतात, याच भावनेतून भाजपचे प्रमुख पदाधिकारी त्यांना साथ देत प्रवेश करत असल्याने जनतेचे प्रेम गडाखांना मिळत असल्याची ही पावती आहे. –

– अजित मुरकुटे, माजी पंचायत समिती सदस्य.

हेही वाचा

Back to top button