कर्जत तालुक्याला दोन आमदार, तरीही नागरिक असुरक्षित

कर्जत तालुक्याला दोन आमदार, तरीही नागरिक असुरक्षित

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : मतदार संघात दोन आमदार असूनही आदिवासी नागरिक असुरक्षित असून, अधिकारी नागरिकांची अडवणूक करतात, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. अरुण जाधव यांनी केली. कर्जत तालुक्यात होणार्‍या आदिवासींच्या विविध प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडीतर्फे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

यावेळी शब्बीरभाई पठाण, नंदकुमार गाडे, तुकाराम पवार, दिसेना पवार, रंगीशा काळे, सोमनाथ गोरे, राहुल पवार, कायदेशीर पवार, सर्वेनाथ काळे आदी उपस्थित होते. तर, आरपीआयचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, रोहन कदम, गोधळ समुद्र, संतोष आखाडे, विजय साळवे, नागेश घोडके, अनिल समुद्र, चंद्रकांत डोलारे, महेश आखाडे, जयराम काळे, सचिन काळे आदींनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.

अ‍ॅड. जाधव म्हणाले, कर्जत-जामखेड मतदार संघात आज सर्वच जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दोन लोकप्रतिनिधी असूनही गोरगरीब नागरिकांना शासकीय कार्यालयामधून काम होत नसल्यामुळे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आजही निमगाव डाकू येथील आदिवासी शेतकर्‍यांची गट नंबर 131 मधून तब्बल दोन हजार ते अडीच हजार ट्रॅक्टर ट्रॉली मुरूम परस्पर उचलून नेला. मागणी करूनही याची चौकशी अधिकारी करत नाहीत.

जमिनीच्या नोंदी होत नाहीत. देशमुख वाडी येथील आदिवासी वृद्ध महिलेची जमीन कुकडी कालव्यामध्ये घेतली. मात्र त्याचा मोबदला दिला नाही. यामुळेच वंचित बहुजन आघाडीने गोरगरीब शोषित, पीडित, आदिवासींसाठी आंदोलन केले. यावेळी महसूल अधिकार्‍यांनी या सर्व मागण्यांचा विचार करून प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले. यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news