अहमदनगर जिल्ह्यात अडीच लाख बेरोजगार तरुण

अहमदनगर जिल्ह्यात अडीच लाख बेरोजगार तरुण
Published on
Updated on

गोरक्ष शेजूळ

अहमदनगर : वाढती लोकसंख्या, त्यात कमी होणारे उद्योग-धंदे आणि यातून वाढती बेरोजगारी, यामुळे आजअखेर राज्यात तब्बल सव्वादोन कोटी तर जिल्ह्यात सुमारे दोन लाख तरुण शासनाकडून नोकरीची प्रतीक्षा करताना दिसत आहे. एकीकडे वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याची घोषणा केली जाते, तर दुसरीकडे गेल्या चार वर्षांत केवळ साडेसात लाख नोकर्‍या दिल्या जात असल्याचे शासनाच्याच आकडेवारीवरून समोर आले आहे.

शासनाकडून महास्वयं या पोर्टलवर सुशिक्षित बेरोजगार तरुणांची नोंदणी केली आहे. पूर्वी एम्प्लॉयमेंट कार्यालये होती. मात्र 2015 नंतर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून रोजगार नोंदणीसंदर्भातील व रोजगार मेळावे याबाबतची जबाबदारी देण्यात आली.

चार वर्षांत फक्त 29 हजार तरुणांना नोकर्‍या!

नगर येथील संबंधित कार्यालयाकडून मिळालेल्या आकेडवारीनुसार, 2019-20 ते 2022-23 या कालावधीत 98280 सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी शासनाच्या महास्वयं या पोर्टलवर नोकरीची मागणी केलेली आहे. यापैकी 28806 बेरोजगारांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकर्‍या मिळाल्या असून, अजूनही 69474 तरुण शासनाकडे नोकरीसाठी डोळे लावून बसल्याचे चित्र आहे. यातील काहींनी नोकरीची अपेक्षा संपल्याने स्वयंरोजगार सुरू केल्याचेही समजते.

'आयटीआय'वाल्यांना नोकर्‍यांत संधी!

नगरमध्ये नोंदणी झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांमध्ये 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, डिग्री, इत्यादी शैक्षणिक पात्रता असलेल्यांचा समावेश आहे. यातील आयटीआय झालेल्या बेरोजगारांना एमआयडीसीमधील काही कंपन्यांमध्ये नोकर्‍या मिळणे शक्य होत आहे.

नोंदणी न केलेले 'बेरोजगार'

शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणार्‍या व्यतिरिक्तही अनेक तरुण रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. संबंधितांची नोंद नाही. मात्र, हा आकडादेखील राज्यात कोटींच्या घरात, तर जिल्ह्यात लाखांत असणार आहे, हेच समजते.राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षीत बेरोजगारांना प्रतिमहा 5 हजार इतका रोजगार भत्ता देण्याची अनेक दिवसांची मागणी आहे. याबाबत अधिवेशनातही काही आमदारांनी शासनाचे लक्ष वेधले होते. मात्र याबाबत ठोस निर्णय होऊ शकला नाही.

नगरची बेरोजगारी
वर्षे     बेरोजगार    नोकरी
2020  37306    4347
2021 23607    10067
2022 16453    5401
2023 20914    8991
एकूण 98280 28806

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार
2,44,930 एकूण
1,79,243 पुरुष
65,687 महिला

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून ज्यांनी शासनाच्या महास्वयं पोर्टवलर नोंदणी केलेली आहे त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन रोजगार मेळावे घेतली जातात. यातून नोकरीची संधी उपलब्ध करून जाते. मात्र अनेकांना मोठ्या पगाराची अपेक्षा असते.

– एन. एन. सूर्यवंशी,
सहायक आयुक्त , जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नगर

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news