जिल्ह्यात पावणेतीन टन सोनं गहाण!

जिल्ह्यात पावणेतीन टन सोनं गहाण!

नगर : पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांपुर्वीच शहर बँकेसह अन्य काही बँका, पतसंस्थांमधील सोनेतारण घोटाळे समोर आले आहेत. कुठे सोने तारणाच्या रुपात दगडं सापडले, तर कुठे बेन्टेक्स आढळल्याचीही चर्चा घडली. मात्र आजही ग्रामीण भागातील संस्थांवर शेतकर्‍यांचा, सामान्य जनतेचा मोठा विश्वास आहे. तर संस्थांनाही शेतकरी प्रामाणिक असल्याची जाणीव आहे. त्यामुळेच सुमारे 381 संस्थांमध्ये तब्बल 2 लाख 70 हजार 200 तोळे (2.75 टन) सोने हे तारण ठेवण्यात आले असून, त्यावर प्रति तोळा 50,000 प्रमाणे तब्बल 1351 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.

दरम्यान, काही घटनांमुळे सोनेतारणाकडे संशयाने पाहिले जात असले तरी अपवाद वगळता अनेक संस्थांनी पारदर्शीपणे सोनेतारण कर्ज वाटप करून यातून संस्थेच्या नफ्यात वाढ केल्याचेच सकारात्मक चित्र आहे.

जिल्ह्यात नागरी, ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांचे मोठे जाळे आहे. 870 पतसंस्था सक्षम आहेत. काटेकोरपणे कारभार करून अनेक संस्थांनी सभासदांचा विश्वास जिंकला आहे.

म्हणून काही ठिकाणी सोनेतारणाला डाग

काही संस्थांमध्ये अधिकारांचा दुरूयोग करून बनावट सोनेतारणावरच कर्ज वाटप केल्याचे उघड झाले आहे. काही दिवसांपूर्वी अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत पाच कोटींचे बनावट सोने तारण कर्ज घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर शहर बँकेतील बनावट सोन्याचे पितळ उघडे पडले. यापुर्वीही राहुरी तालुक्यातील जिल्हा बँकेच्या एका शाखेत बनावट सोने तारण देऊन कर्ज उचलले.श्रीरामपूर शहरातील जिल्हा बँकेच्या शाखेतही बनावट सोनेतारणचे प्रकरण गाजले. याशिवाय अन्य काही दिग्गजांच्या संस्थांचा समावेश असलेल्या अशा एक ना अनेक घटनांमुळे सोने तारणला अविश्वासाचा डाग लागल्याचे चित्र आहे.

मंगळसूत्रही पतसंस्थांकडे तारण!

खरीप आणि रब्बी हंगामात पिके घेताना अगोदरच थकबाकीदार असल्याने बँका पुन्हा दारात उभे करत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना शेवटचा पर्याय म्हणून बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्रही बँकेकडे तारण ठेवण्याची वेळ येते. त्यातून मिळणार्‍या पैशातून शेतकरी पुन्हा स्वप्ने पेरतो आणि हातातोंडाशी घास आल्यानंतर निसर्गाची अवकृपा आणि यातून पिके वााचलीच तर पडणारे बाजारभाव, यामुळे शेतकर्‍यांच्या स्वप्नांवर पुन्हा पाणी फिरते. या दृष्टचक्रामुळे तारण ठेवलेले सोने तो परत मिळवू शकत नाही. आपल्या डोळ्यांनी त्याचा लिलाव होताना त्याला पहावे लागते.

अनेक संस्थांची झाली भरभराट

आजमितीला अनेक संस्थांनी सोनेतारण कर्ज वाटपातून संस्थेला नफा मिळवून दिला आहे. जिल्ह्यात 95 टक्के संस्था पारदर्शीपणे सोने तारण प्रक्रिया राबवत आहेत. तर 5 टक्के संस्थांमध्ये सोनेतारण अनियमितता असू शकते, असा सहकार विभागाचाच अंदाज आहे. त्यामुळे चांगल्या संस्थांचे कौतुक करतानाच चुकीचा कारभार करणार्‍या संस्थांवर सहकार विभाग कारवाईसाठी सज्ज असल्याचेही समजते.

तोळ्याला 50 हजारांचे कर्ज!

जिल्ह्यातील 381 संस्थांमध्ये सोनेतारण कर्ज सुविधा उपलब्ध आहे. काही मिनीटातचं सोने तारण ठेऊन तोळ्याला 50 हजारांचे कर्ज दिले जाते. कागदपत्रांचा ससेमिरा नाही किंवा वाढीव व्याजदराचा भुर्दंड नसल्याने सोनेतारण कर्जासाठी संस्था आणि कर्जदारांकडूनही पसंती दिसत आहे.

सराफावरच अधिक भरवसा..!

आतापर्यंत जेवढे सोने तारण प्रकरणाचे घोटाळे बाहेर आले आहेत. त्यामध्ये संबंधित कर्जदाराबरोबरच त्याचे सोने तपासणारा सराफ आणि कर्ज वाटप करणारे पदाधिकारी हेच अडचणीत आलेले आहेत. कधी कधी तर कर्जदार असलेला व्यक्ती प्रत्यक्षात हयात नसतो, किंवा त्याला आपल्या नावावर कोणी कर्ज उचलल्याची जाणीवही नसते. अशावेळी सराफ आणि पदाधिकारी हेच अधिकाराचा वापर करून तारण पिशवीत बनावट सोने किंवा प्रसंगी दगडे ठेऊनही त्यावर कर्ज उचलून ते वापरत असल्याचे काहीप्रकरणातून पुढे आलेले आहे.

सहकार विभागाचे हात अपुरे..!

संस्थांकडे तारण असलेले सोने आणि दिलेल्या कर्जाची सहकार विभागाच्या लेखापरीक्षकाकडून ऑडीट करताना फक्त आकडेमोड केली जाते. मात्र तारण सोने तपासण्याचा कोणताही अधिकार त्यांना दिलेला नाही. त्यामुळे ज्यावेळी संस्थेतील सत्तेत बदल होतो, मुदतीत सोने सोडविले जात नाही, त्याचा लिलाव करण्याची वेळ येते आणि ज्यावेळी तारण पिशवी उघडली जाते, त्यावेळी त्यात बनावट सोने निघाल्याचे प्रकारही नवे नाहीत. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी सहकार विभागाला तसे काही कायदेशीर अधिकार मिळण्याची गरज आहे.

जिल्ह्यात सहकार चळवळ गतीमान होत आहे. काही संस्था सोडल्या तर अनेक संस्था सोनेतारणात आदर्श काम करत आहेत. सभासदांचा, ठेवीदारांचा संस्थेवर विश्वास असतो, त्यांचा आपल्या फायद्यासाठी कोणीही विश्वासघात करता कामा नये.

– शिवाजीराव कपाळे, चेअरमन, साई आदर्श मल्टिस्टेट

संगमनेरसह जवळ जवळ 95 टक्के संस्थांनी सोनेतारण कर्जाचे पारदर्शीपणे वाटप केले आहे. यातून संस्थेच्या नफ्यात वाढ होत आहे. जिल्ह्यातील अपवादात्मक संस्थांमधील बनावट सोने तारणचा प्रकार सोडला तर सर्वच संस्था चांगल्याप्रकारे काम करत आहे.

– गणेश पुरी, जिल्हा उपनिबंधक, नगर

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news