संगमनेर : कुरणला चंदन झाडांची चोरी; चार जणांवर गुन्हा

संगमनेर : कुरणला चंदन झाडांची चोरी; चार जणांवर गुन्हा

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा:  कुरण येथे एका शेतकर्‍याच्या शेतातील सुमारे 40 हजार रुपये किमतीच्या चंदनाच्या पाच झाडांची चार जणांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी सांगितले की, संगमनेर तालुक्यातील कुरण येथे जब्बार सत्तार शेख राहतात.

शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शेख नेहमीप्रमाणे वस्तीकडे जात असताना त्यांच्या शेताजवळ राहणारे जगन्नाथ नाथा माळी, मिराबाई जगन्नाथ माळी, विश्वास जगन्नाथ माळी व राजु जगन्नाथ माळी (सर्व रा. कुरण, ता. संगमनेर) हे त्यांना भेटले असता शेख यांनी, 'पोत्यामध्ये तुम्ही काय आणले,' असे विचारले असता, जगन्नाथ याने सांगितले की, 'आम्ही सर्वांनी चुल पेटविण्यासाठी सरपण आणले, परंतु गोण्यांमध्ये मोठे लाकडं असल्याने शेख यांना शंका आल्याने त्यांनी गोण्या पाहिल्या असता त्यांना चंदनाची लाकडं आढळली.

याबाबत जब्बार शेख फिर्यादीवरून जगन्नाथ नाथा माळी, मिराबाई जगन्नाथ माळी, विश्वास जगन्नाथ माळी व राजु जगन्नाथ माळी (सर्व रा. कुरण, ता. संगमनेर) यांच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला. अधिक तपास प्रभारी शहर पो.नि. राजेंद्र भोसले करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news