Nagar : नेवाशात आरोग्य वार्‍यावर ; बीडीओ, तालुका आरोग्य अधिकारी प्रभारी

Nagar : नेवाशात आरोग्य वार्‍यावर ; बीडीओ, तालुका आरोग्य अधिकारी प्रभारी

नेवासा : शहरासह तालुक्यात साथरोगांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, रोगट वातावरणामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पंचायत समितीला 'बीडीओ' व नेवासा तालुका आरोग्य अधिकारी नसल्याने या विभागात मनमानी वाढली आहे. येथील आरोग्य विभाग सुस्त बनला आहे. सध्या दोन्ही पदांवर प्रभारीराज आहे. अडीच वर्षे जिल्हावासीय करोना महामारीच्या सावटाखाली होते. नेवासा आरोग्य विभागाचा मोठा गाजावाजाही झाला. पंरतु, आता याच आरोग्य विभागाचे नियंत्रण राहत नसल्याने रुग्णांची ओरड वाढली आहे. नेवासा तालुक्यात दमदार पाऊस झाला नसल्याने साथरोगांचे प्रमाण वाढले आहे.

तालुक्यातील साथीच्या आजारांवर प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये उपचार केले जात आहेत. सध्या तालुक्यात सर्वत्र सर्दी, ताप, खोकला आणि विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. रुग्णांना हव्या त्या सुविधांचा अभाव असल्याचे नागरिक सांगतात. पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या प्रभारी अधिकार्‍यांचे कर्मचार्‍यांवर नियंत्रण राहत नसल्याने कर्मचार्‍यांचा कामचुकारपणा वाढला आहे.
शहरात व तालुक्यात कमी अधिक फरकाने घाणीचे साम्राज्य आहे. सोनई परिसरात डेंग्यू सदृश्य आजाराचे थैमान घातलेले आहे. रस्त्यावरील व इतरत्र घाण नाल्यांमधून वाहून जात नाही. ढगाळ परिस्थितीमुळे रोगट वातावरणामुळे निर्माण होवून सर्दी, खोकला, ताप, डोळे येणे, तोंड येणे, गालफुगी असे रुग्ण वाढले आहेत. खासगी दवाखान्यात रुग्ण संख्या वाढली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद करण्याच्या हालचाली असल्याची चर्चा आहे. यामुळे रुग्णांना सुविधांचा अभाव जाणवत असल्याचे नागरिक सांगतात.
नेवासा पंचायत समितीला सध्या 'बीडीओ' नसल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. सहायक बीडीओंकडे सध्या कारभार आहे. पर्यायाने विस्कळित पणा असून, त्याचा आरोग्य विभागावरही परिणाम जाणवत आहे. पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या कामकाजात सुधारणा करण्याची मागणी नागरिकांनी केली.

आरोग्य विभागाची तात्पुरतीच मलमपट्टी
नेवाशात तालुका आरोग्य विभागामार्फत साथरोगांचे प्रमाण वाढल्याने कोणत्याही हालचाली केल्या नव्हत्या. दैनिक 'पुढारी'मध्ये याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्याने वरिष्ठांनी येथील विभागाची कागदोपत्री कानउघाडणी केली होती. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना साथरोगांच्या निपटार्‍याचे आदेश दिले होते. पंरतु, ठोस उपाययोजना केल्या नाहीत.

'तालुका आरोग्य अधिकारी द्या'
नेवासा पंचायत समितीच्या आरोग्य विभागात कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. शहरात साथरोगांचे रुग्ण वाढल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. नेवाशात तालुका आरोग्य अधिकारी द्या, अशी मागणी 'आप'चे नेते अ‍ॅड. सादिक शिलेदार यांनी केली. यासाठी त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news