नगर : मिडसांगवी येथे रंगले पहिले रिंगण

नगर : मिडसांगवी येथे रंगले पहिले रिंगण

खरवंडी कासार (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : हरिनामाचा जयघोष आणि टाळ मृदंगाच्या गजरात पैठण येथील शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे पहिला रिंगण सोहळा पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे रंगले. त्यानतंर पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावेळी पालखीला निरोप देण्यासाठी खरवंडी कासार परिसरातील भाविकांनी मिडसांगवी येथे हजेरी लावली. या पालखी सोहळ्यात विदर्भ, खान्देश व मराठवाडा येथील अनेक दिंड्या सहभागी झाल्या आहेत. 19 दिवसांच्या पायी प्रवास करून पालखी पंढरपूरला पोहचणार आहे. मंगळवारी शांती ब्रम्ह संत एकनाथ महाराज यांची पालखी श्री भगवानगड परिसरात दाखल झाली.

मोठ्या उत्साहात भाविकांकडून वारकर्‍यांचे स्वागत झाले. दुपारी मिडसागंवी येथे सालशिद बाबा देवस्थानचे महंत हभप हनुमानशास्त्री यांनी पालखीचे स्वागत केले यावेळी पाथर्डीचे गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान दराडे, मिडसांगवीचे सरपंच भगवान हजारे, उपसरपंच विष्णू थोरात, बापूराव पठाडे, दत्तात्रय पठाडे उपस्थित होते स्वागत व दर्शन सोहळ्यानंतर पालखीचा पहिला रिंगण सोहळा पार पडला. यावेळी गावकर्‍यांसह भाविकांचा आनंद द्विगुणीत झाला होता. या सोहळ्यात भानुदास एकनाथच्या नाम घोषात विठ्ठलाच्या ओढीने वारकरी मोठ्या उत्साहात पायी वारीचा आनंद घेत असतात. गावागावांत होणारे स्वागत व होणारा विठ्ठल नामाचा गजर, या भक्तीरसात वारकर्‍यांबरोबर गावकरी तल्लीन होत आहेत.

पालखीला पंढरपूरमध्ये दोन मान
या पालखीला पंढरपूरमध्ये दोन मान आहेत. विठ्ठल मंदिरात संत एकनाथांचे पंजोबा संत भानुदास यांची समाधी असून, आषाढ वारी सोहळ्यात विठ्ठल मंदिरात पालखीकडून पुण्यतिथी उत्सव साजरा होतो. या दिवशीचा विठ्ठलाचा नैवेदही या पालखीकडून असतो. तसेच, आषाढीसाठी पंढरपूरमध्ये जाणार्‍या सर्व दिंड्या, पालख्या काला घेण्यासाठी गोपाळपूरमध्ये जातात. मात्र, संत एकनाथ यांच्या पालखीचा काला विठ्ठल मंदिरातच होतो.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news