महायुतीच्या काळात विकासाला गती : डॉ. सुजय विखे

महायुतीच्या काळात विकासाला गती : डॉ. सुजय विखे
Published on
Updated on

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विविध विकासकामे सातत्याने सुरू आहेत. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तालुक्यात आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वात किमान शंभर कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. नागरिकांना भेडसावणारे विविध प्रश्न भाजपच्या काळामध्ये सुटत आहेत, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत राज्यमार्ग 61 घोटण ते दहिफळ जुना रस्ता 5 कोटी 56 लाख, प्रजिमा-40 (दहिगाव-शे) चापडगाव भिसे वस्ती, अंतरवाली बुद्रुक ते शिंगोरी रस्ता 2 कोटी 70 लाख व चापडगाव मंगरुळ बुद्रुक, वडगाव रस्ता 8 कोटी 41 लाख (एकूण 16 कोटी 76 लाख रूपये) या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन खासदार विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लक्ष्मणराव टाकळकर होते. यावेळी आमदार मोनिका राजळे, भाजपचे प्रदेश चिटणीस अरूण मुंढे, तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, महिला तालुकाध्यक्ष आशा गरड, गंगामाई कारखान्याचे उपाध्यक्ष व्ही. एस. खेडेकर, तहसीलदार प्रशांत सांगडे, गटविकास अधिकारी राजेश कदम, भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल सागडे, माजी नगरसेवक सागर फडके, बाळासाहेब कोळगे, चंद्रकांत गरड, संजय टाकळकर, घोटणच्या सरपंच ताराबाई घुगे, उपसरपंच पिरमंहमद शेख, गणेश कराड, तुषार पुरनाळे, कैलास सोनवणे, फुलचंद रोकडे, बी. जे. मुरदारे आदी उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले, प्रत्येक वर्षी देशात घरोघर दिवाळी सण साजरा केला जातो. पहिली दिवाळी विधिवत साजरी झाली आणि दुसरी दिवाळी ही 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने साजरी होणार आहे. त्यामुळे यावर्षी आपण दोन दिवाळी उत्सव साजरा करीत आहोत. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक गावातील कुटुंबांना पाच किलो साखर व चणा डाळ वाटप करण्यात येत आहे. साखर व डाळीपासून प्रत्येक कुटुंबाने या दिवशी लाडू करून हा सोहळा साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार राजळे म्हणाल्या, चार राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपला तीन राज्यांत घवघवीत यश मिळाले. त्यामुळे कार्यकर्ते व जनतेत उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेली दहा वर्षे सामान्य जनता, तरूण व महिलांसाठी आरोग्य, शैक्षणिक, वैयक्तिक लाभ व विविध विकासकामे केल्याने हे यश आपल्याला मिळत आहे. मोदींनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत्या लोकसभेला आपणास सामोरे जायचे आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा व साखर वाटपाचा प्रारंभ घोटण येथून खासदार विखे व आमदार राजळे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्तविक संजय टाकळकर यांनी केले. उपसरपंच पिरमंहमद शेख यांनी आभार मानले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news