

नगर : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर करताच नगर तालुका बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात गावराव व लांल कांद्याच्या भावात क्विंटलमागे दीड हजार रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे संतप्त कांदा उत्पादक शेतकर्यांनी काही वेळ गोंधळ घातला. कालच्या लिलावासाठी गावरान कांद्याची 4 हजार 439 गोण्यांची, तर लाल कांद्याची 56 हजार 705 गोण्यांची आवक झाली. सुमारे 306 गाड्यांची कांदा आवक झाली.
मात्र, केंद्राच्या निर्यातबंदी धोरणामुळे आवक कमी होऊनही कांद्याचे भाव क्विंटलमागे 1500 रुपयांनी घसरले. मात्र, शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला. कालच्या लिलावात एक नंबरचा गावराव कांदा 2800 ते 3500 रुपये, नंबर दोन 2000-2700 रुपये, नंबर तीन 1200-1900 रुपये, तर लहान आकारचा कांदा 700 रुपयांच्या पुढे विकला गेला. लाल कांदाही साडेचार रुपयांवरून तीन हजारांवर घसरला. नंबर एकच्या कांद्याची 2500-3050 रुपये, नंबर दोनची 1200-2400 रुपये, तर नंबर 700-1100 रुपये, लहान कांद्याची 300 रुपयांच्या पुढे विक्री झाली.
कांद्याचे भाव साडेचार हजारांवर गेल्यानंतर शेतकर्यांचा उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसला होता. आता पदरात काहीच पडणार नाही. नैसर्गिक संकटाने कांद्याचे मोठे नुकसान झाले. आता भाव उतरले. मतांचे राजकारण करणार्या केंद्र सरकारला शेतकर्यांनी धडा शिकवावा, अशी संतप्त भावना कांदा उत्पादकांनी व्यक्त केली.
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेऊन कांदा उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. समाधानकारक भावामुळे कांदा उत्पादन खर्चाचा मेळ बसत होता. मात्र, भाव घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या निर्णय किंमत केंद्र सरकारला मोजावी लागेल. असे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदेश कार्लेयांनी सांगितले.
हेही वाचा