कोपरगांव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : जगातील एकमेव असलेल्या येथील बेट भागातील गुरू शुक्राचार्य मंदिरामध्ये सद्गुरू शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव व शिव-पार्वती विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमाचे मठाधिपती प.पू. रमेशगिरी महाराज, विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाचे जंगलीदास गुरुमाऊली, शारदागिरी महाराज, उंडे महाराज व अन्य संत, महंतांसह शेकडो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सहभागी होऊन शुक्राचार्य महाराजांचे व पालखीचे मनोभावे दर्शन घेतले.
श्रावण महिन्यातील श्रावण शुद्ध अष्टमीला स्वाती नक्षत्राचे औचित्य साधत शुक्राचार्य मंदिरात गुरुवारी शुक्राचार्य महाराजांचा जन्मोत्सव व शिव-पार्वती विवाह सोहळ्याप्रसंगी शेकडो भावीक उपस्थित होते. पालखी मिरवणुकीनंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी युवा नेते विवेक कोल्हे यांचा सत्कार केला. कोल्हे यांनी मंदिर ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांबद्दल ट्रस्टच्या पदाधिकार्यांचे कौतुक केले.
याप्रसंगी अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, दादासाहेब नाईकवाडे, विजय रोहम, विलासराव आव्हाड, अप्पासाहेब शिंदे, भागचंद रुईकर, मंदिरप्रमुख सचिन परदेशी, कालूअप्पा आव्हाड, बाळासाहेब लकारे, विशाल आव्हाड उपस्थित होते.
हेही वाचा