

नगर : पुढारी वृत्तसेवा : सराफ बाजारातील वर्मा ज्वेलर्स फोडून चोरांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 24 लाखांचा ऐवज लुटला. या गुन्ह्यातील दोन आरोपींना कोतवाली पोलिसांनी नाशिक येथे धावत्या रेल्वेतून जेरबंद केेले. त्यांच्याकडून 3 लाख 34 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. अन्य आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली आहे. अक्षयसिंग बिरूसिंग जुनी (वय 22, रा. वैदवाडी, गोसावी वस्ती, हडपसर), अनमोल चरणसिंग शिकलकर (वय 23, रा. नाशिक रोड, सिन्नर फाटा सिकलकर वस्ती) अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. सराफा बाजारातील वर्मा ज्वेलर्स या सराफ दुकानाचे शटर उचकटून काही जणांनी रविवारी पहाटे (ता.1) सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 24 लाख 68 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. जाताना सेक्युरिटी कामगार आणि स्वच्छता कर्मचारी यांना चाकूचा धाक दाखवून दमदाटी केली होती.
संबंधित बातम्या :
सराफ बाजारातील दुकान फोडण्यापूर्वी आरोपींनी नाशिकमधून कार चोरली होती. त्याच कारमधून नगरमध्ये येऊन सराफ बाजारातील दुकान फोडले. अहमदनगर, गंगापूर, वैजापूर या मार्गे चोरटे पळून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून लक्षात आल्यानंतर कोतवाली पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. येवल्यानजीक रस्त्याच्या कडेला ती कार पोलिसांना आढळून आली. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाली, की दोन आरोपी मुंबईकडे पळून जाण्याच्या तयारीत आहेत. पोलिसांनी तत्काळ सापळा लावून धावत्या रेल्वेतून दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी अन्य सहा साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून 42.790 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि सोने विक्रीचे 91,000 रुपये असा 3 लाख 34 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी विश्वास भान्सी पुढील तपास करीत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि विश्वास भान्सी, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, गजेंद्र इंगळे, पोलिस कर्मचारी तन्वीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, सलिम शेख, शाहीद शेख, इस्राईल पठाण, ए. पी इनामदार, अमोल गाढे, सतीश शिंदे यांच्या पथकाने केली.