शेवगाव तालुका (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : वाळू तस्करांनी पोलिस पथकास चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि.7) पहाटे घडली. मात्र, पोलिस बाजूला पळाल्याने बालंबाल बचावले. याबाबत पाच वाळू तस्करांवर गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. तीन जण पसार झाले आहेत. या छाप्यात 68 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तालुक्यातील सामनगाव शिवारात सारपे वस्तीवर अनधिकृत वाळूचा साठा करून त्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती परीविक्षाधीन सहाय्यक पोलिस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशाने सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके, हवालदार पांडुरंग वीर, रवींद्र शेळके, आदिनाथ वामन, राहुल खेडकर एकनाथ गर्कळ, वैभव काळे, चालक असलम शेख या पोलिस पथकाने सोमवारी पहाटे 4.20 वाजता सदर ठिकाणी छापा टाकला.
पोलिस पथक पाहताच वाळू तस्करांची पळापळ सुरू झाली. यातील काही जण वाहन सोडून पळून गेले. तेथे असलेल्या स्कॉर्पिओच्या चालकाने पळून जाताना वाहन भरघाव वेगाने पोलिस पथकाच्या अंगावर घालूण त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सावध असल्याने पोलिस बाजूला पळाल्याने बचावले. अचानक पुढे मोठा खड्डा आल्याने, हे वाहन थांबताच पोलिसांनी चालक लाला तमिज शेख (रा.भातकुडगाव, ता. शेवगाव) व दुचाकीवरून पळून जाणार्या ऋषिकेश अर्जुन आहेर (रा.भातकुडगाव, ता. शेवगाव) अशा दोघांना ताब्यात घेतले.
याठिकाणी 4 लाख 12 हजार 500 रूपये किंमतीच्या 55 ब्रास वाळूसह, दोन डंपर, तीन ट्रॅक्टर, दोन मोटारसायकली, एक जेसीबी, एक स्कॉर्पिओ जीप, असा 67 लाख 95 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत लाला शेख, ऋषिकेश आहेर, नागेश बडधे, गोकुळ आठरे, सचिन तोगे व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील बडधे, आठरे, तोगे व इतर पसार झाले आहेत. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके करीत आहेत.
हेही वाचा :