संगमनेरकरांनी पेटविल्या वाळूने भरलेल्या गोण्या

संगमनेरकरांनी पेटविल्या वाळूने भरलेल्या गोण्या

संगमनेर शहर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शहरातील गंगामाई घाटावर सतत वाळू तस्करी होत आहे. या वाळू तस्करांविरोधात संगमनेरच्या पर्यावरण प्रेमी नागरिकांसह व्यापारी मित्रांनी आवाज उठवित वाळू भरून ठेवलेल्या गोण्या जाळून रोष व्यक्त केला.
संगमनेरात वाळू तस्करी हा विषय चर्चेचा झाला आहे.

वाळू तस्करीसाठी शहरातून सोप्या पद्धतीने प्रवरा नदी पात्रातील गंगामाई घाट परिसर फायदेशीर ठरत आहे. येथून मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी होत असल्याचे दिसते. मागील काही दिवसांपूर्वी वाळू तस्करांनी भरून ठेवलेल्या वाळूच्या शेकडो गोण्या गंगामाई घाट परिसरात फिरायला येणार्‍या नागरिकांसह व्यापारी मित्रांनी नदीत फेकून गोण्या जाळून नष्ट करीत वाळू तस्करांविरुद्ध तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या.

पुन्हा गंगामाई घाटावर फिरणार्‍या नागरिकांसह व्यापार्‍यांना वाळू तस्करी होत असल्याचे दिसले. घाटाच्या पायर्‍यांवर तस्करांनी रात्री चोरून वाळू गोण्यांमध्ये भरून ठेवलेली वाळू पुन्हा नदीत ओतून गोण्या जाळल्या. 'नागरिक सतर्क असले तरी महसूल खाते कधी सतर्क होणार' हा प्रश्न आहे.

ड्रोनद्वारे लक्षचे काय..?

महसूलमंत्र्यांनी वाळू धोरण जाहीर करून वाळूचे डेपो सुरू केले. वाळू तस्करीवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाईल, असे जाहीर केले. त्याचे पुढे काय झाले, हे महसूल विभागालाच ठाऊक. वाळू तस्करी मात्र थांबायचे नाव घेत नाही, असे या घटनेवरून दिसत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news