

कोळपेवाडी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम 2022/23 मध्ये जिल्ह्यात सर्वाधिक 2,725 रुपयांचा दर देण्यात आघाडी घेतल्याचा दावा कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी केला आहे. आहे. दरम्यान, गाळप उसाचे प्र. मे. टन रुपये 225 प्रमाणे पेमेंट शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा केले असून, यापूर्वी 2500 रुपये दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2022/23 मध्ये एकूण 5,24,947 मे.टन ऊस गाळप केले. इतर कारखान्यांना कराराने 27,959 मे. टन ऊस पुरवठा करून या गळीत हंगामात एकूण 5,52,907 मे. टन ऊस गाळप केले. यापूर्वी पहिले पेमेंट 2500 प्रमाणे ऊस गाळपास आल्यानंतर 15 दिवसांच्याआत शेतकर्यांना अदा केले.
शेतकरी आज आर्थिक अडचणीत आहे. कांद्याला भाव नाही. बहुतांश कांदा चाळीत सडू लागला आहे. कापूस व सोयाबीनचे दर देखील कमी झाले आहे. केवळ ऊसालाच एफ. आर.पी.प्रमाणे हमीभाव मिळतो. त्यामुळे खरीप हंगामात बी-बियाणे, रासायनिक खते आदीसाठी शेतकर्यांना पैशाची आवश्यकता आहे.
खरीप हंगामात शेतकर्यांना पिके उभी करण्यास आवश्यक असलेल्या भांडवलाचा विचार करून काळे साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकर्यांना प्रती मे.टन रुपये 225/- प्रमाणे ऊस पेमेंट देण्याचा निर्णय घेतला. हे पेमेंट ऊस उत्पादक शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे. पहिले पेमेंट रुपये 2,500 तर आत्ताचे 225 असे एकूण 2,725 रुपये प्रती मे.टन ऊस उत्पादक शेतकर्यांना अदा केल्याची माहिती देत आ. आशुतोष काळे यांनी शेतकरी हिताला प्रथम प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट केले.
दिवंगत माजी मंत्री शंकरराव काळे, माजी आ. अशोकराव काळेंसह विद्यमान आ., काळे कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे अशी तिसरी पिढी शेतकर्यांच्या हितास कर्तव्यदक्ष असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
हेही वाचा