

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : दरोड्याच्या तयारीत असलेल्या 11 आरोपींच्या टोळीला बेड्या ठोकल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने त्याच टोळीच्या म्होरक्याला उत्तर प्रदेशातून अटक करत संगमनेरमधील 'जलजीवन'चे लोखंडी पाईप चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावला आहे. एलसीबीचे प्रमुख पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने उत्तर प्रदेशात जाऊन चोरीला गेलेले 35 लाखांचे तीन ट्रक भरून लोखंडी पाईप जप्त केले. शिवकुमार नानकऊ सरोज (रा.गौरीयाबाद, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या टोळीच्या म्होरक्याचे नाव आहे. दरोडा टाकण्यासाठी शेंडी बायपास परिसरात एका हॉटेलजवळ दबा धरून बसलेल्या राजस्थान व हरियाणातील 11 जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आठवडाभरापूर्वी पकडले होते.
दरम्यान, संगमनेर येथील जलजीवन मिशन योजनेचे लोखंडी पाईप या टोळीनेच चोरल्याची माहिती निराक्षक आहेर यांना मिळाली. त्या आधारे कोठडीतील आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी पाईपचोरीची माहिती दिली. टोळीच्या म्होरक्याच्या घरासमोर चोरीचे पाईप असल्याची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीची टीम उत्तर प्रदेशात पोहचली. म्होरक्या शिवकुमार नानकऊ सरोज याला 367 लोखंडी पाईपसह गौरीगंज येथून अटक केली. संगमनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास संगमनेर पोलिस करीत आहेत.
दरोड्याच्या तयारीच्या गुन्ह्यात 11 आरोपी पोलिस कोठडीत असताना एलसीबीची टीम टोळीच्या म्होरक्याला पकडण्यासाठी उत्तर प्रदेशात तपास करीत होती. संगमनेर येथील जलजीवन योजनेचे पाईप आरोपीच्या घरासमोर असल्याची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीच्या टीमने उत्तर प्रदेशात जाऊन टोळीच्या म्होरक्याला अटक केली. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, सचिन आडबल, संतोष लोढे, विजय ठोंबरे, फुरकान शेख, संतोष खैरे, अमृत आढाव, रोहित मिसाळ, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड या पथकाने गुन्ह्याचा योग्य तपास करून उत्तर प्रदेशातून चोरीच्या मुद्देमालासह आरोपी गजाआड केले.
हेही वाचा