

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज (दि. 27) 'एमआयडीसी'च्या प्रश्नावरून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी आमदार राम शिंदे व भाजप, तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार टीका केली. या आंदोलनामध्ये माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील शेलार, दीपक शिंदे, नगराध्यक्ष उषा राऊत, गटनेते संतोष मेहत्रे, माजी नगराध्यक्ष प्रतिभा भैलूमे, नगरसेविका छाया शेलार, ज्योती शेळके, हर्षदा काळदाते, विशाल मेहत्रे, प्रसाद ढोकरीकर, उपघटनेते प्राध्यापक सतीश पाटील, राहूल शिंदे, मोहनराव गोडसे, श्रीमंत शेळके, रवींद्र सुपेकर, भूषण ढेरे, भाऊसाहेब तोरडमल, अभय बोरा, रज्जाक झारेकरी, लालासाहेब शेळके, राजश्री तनपुरे, सचिन सोनमाळी, संतोष नलावडे, नामदेव थोरात, महादेव खंदारे, स्वप्निल तनपुरे, राहुल खराडे, दादा चव्हाण आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
गटनेते संतोष मेहत्रे म्हणाले, कर्जत-जामखेड तालुक्यातील युवकांसाठी आमदार रोहित पवारांनी 'एमआयडीसी'साठी प्रयत्न केले. सर्व बाबींची पूर्तता झाली असताना केवळ या ठिकाणीचे पराभूत भाजपचे आमदार व भाजपचे काही नेते जाणीवपूर्वक विरोध करत आहेत. मंजूर 'एमआयडीसी'ला सरकार अंतिम मंजुरी देत नाही. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बैठक घेण्याचे आश्वासन देऊनही सर्व युवकांसह आमदार रोहित पवारांची फसवणूक केली. याच्या निषेध करण्यासाठी आम्ही आंदोलन केले.
शहराध्यक्ष सुनील शेलार म्हणाले, आमदार रोहित पवारांनी प्रामाणिकपणे आमदार झाल्यानंतर सातत्याने पाठपुरावा करून 'एमआयडीसी'ची सर्व बाबीची पूर्तता केली. मात्र, केवळ आमदार राम शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत याचे श्रेय आमदार पवारांना मिळू नये म्हणून 'एमआयडीसी' होऊ देत नाहीत.
विशाल मेहत्रे म्हणाले, कर्जत-जामखेड मतदार संघामधून आमदार पवारांनी माजी मंत्र्यांना पराभव करून विकासाचा प्रारंभ केला आहे. युवकांना काम मिळावे म्हणून 'एमआयडीसी'साठी सातत्याने पाठपुरावा केला. दुर्दैवाने सरकार गेले अन् काम सुरू झाले नाही. यावेळी प्रसाद ढोकरीकर, भास्कर भैलूमे, स्वप्निल तनपुरे यांची भाषणे झाली.
नामदेव राऊत म्हणाले, मी राजकारणात सक्रिय कार्यकर्ता असून, दहा वर्षे आमदार राम शिंदे यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून काम केले. परंतु, त्यांनी कधीही कर्जत 'एमआयडीसी'च्या प्रश्नावर पुढाकार घेतला नाही. आम्ही सूचना करुनही ते दखल घेत नव्हते. सिद्धटेक येथे 40 एकर जागेमध्ये कोणती 'एमआयडीसी' करणार होते. जामखेडच्या 'एमआयडीसी'बाबत आम्ही पाठपुरावा केला, तरीही त्यांनी फारशी उत्सुकता दाखवली नाही, आता मात्र आमदार पवारांनी पूर्तता केली असताना केवळ विरोध करायचा म्हणून 'एमआयडीसी' होऊ देणार नसेल तर कर्जत-जामखेड मतदार संघातील बेरोजगार युवक भाजपला निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवतील.
हेही वाचा