ही वहिवाट लई बिकट ! ढोरजळगाव ते तेलकुडगाव रस्त्याची दुरवस्था | पुढारी

ही वहिवाट लई बिकट ! ढोरजळगाव ते तेलकुडगाव रस्त्याची दुरवस्था

ज्ञानेश्वर फसले

ढोरजळगाव : शेवगाव आणि नेवासा तालुक्याला जोडणार्‍या ढोरजळगाव ते तेलकुडगाव या 5 किमी अंतराच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, ‘ही वहिवाट लई बिकट असल्याचे नागरिक गेल्या 25 वर्षांपासून म्हंणत आहेत. परंतु, त्यांचे ऐकणारे कोणी नाही, अशीच म्हणन्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या रस्त्यावरून ये-जा करणार्‍या नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. शेवगाव, नेवासा तालुक्याला जोडणारा जवळचा मार्ग म्हणून या रस्त्याकडे पाहिले जाते.

येथून तेलकुडगावमार्गे भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्यावर जाण्यासाठी हा सोईचा अन् जवळचा मार्ग आहे. अनेक कामगार या रस्त्याचा वापर करतात. शेतकर्‍यांचा ऊस ढोरजळगाव परिसरातून ज्ञानेश्वर कारखान्यावर नेण्यासाठी ही हा अत्यंत जवळचा आहे. जवळपासच्या नागरिकांना खरेदीसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. ढोरजळगावने येथे त्रिमूर्ती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या कोर्ससाठी अनेक विद्यार्थी तेलकुडगाव परिसरातून येतात.

नाथ संप्रदायातील नवनाथांपैकी सिद्ध नागनाथांचे वास्तव्य तेलकुडगावी असल्याची आख्यायिका आहे. धरणाच्या सिंचन कालव्यांमुळे हा सर्व परिसर बागायती म्हणून ओळखला जातो. ऊस, केळी, टोमॅटो व वांगी यासारख्या पिकांची, तसेच दुधाची वाहतूकही या रस्त्याने होते. हे सर्व असताना मात्र गेल्या 25 वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था असून, पावसाळ्यात तर रस्त्याला अक्षरशः ओढ्याचे स्वरूप येते.

ढोरजळगाव येथून माजी आमदाार नरेंद्र घुले यांच्या कार्यकाळात नाबार्डच्या माध्यमातून 2 किमी अंतराचा डांबरीरस्ता झाल्यानंतर गेल्या वर्षी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्या माध्यमातून पुन्हा या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. परंतु, ढोरजळगाव हद्दीतील कराड वस्ती ते तेलकुडगाव हद्दीतील घाडगे वस्ती या सुमारे दोन ते तीन किमी अंतराचा रस्ता हा ना मुरमाचा, ना डांबराचा असा आहे.

तेलकुडगाव हद्दीमध्ये मोठा पाण्याचा पाट असून, त्याच्या पोट चार्‍याचे पाणी सतत या रस्त्यावर असते. या पाण्यामुळे गुडघाभर खड्डे रस्त्यावर पडले आहेत. उन्हाळा आणि हिवाळ्यात खड्ड्यामध्ये आदळून अनेक वाटसरूंना मणक्याचे विकार जडला आहे.
पावसाळ्यात या रस्त्यावरून जाताना खड्ड्यांबरोबर त्याच साचलेल्या पाणी आणि दलदलीचा सामना करावा लागतो. चारचाकी वाहने तर जाणेच मुश्किल होते. त्यात दुचाकी चालवणे तर सोडाच; परंतु दुचाकी ढकलत न्यावी लागते. तेलकुडगाव येथे आरोग्य सुविधा कमी असल्याने रात्री अपरात्री रुग्णाला किंवा बाळंतपणाच्या रुग्णाला तत्काळ ढोरजळगाव येथे न्यावे लागते.

अशावेळी या रस्त्याने जाणे अशक्य होते. तर, तेलकुडगाव हद्दीमध्ये घाडगे वस्तीपर्यंत 1 किमी अंतराचा रस्ता आमदार शंकरराव गडाख यांच्या निधीतून झालेला आहे. परंतु, या रस्त्याच्या दुतर्फा असणार्‍या शेतकर्‍यांनी साईड पट्टी न ठेवता अक्षरशः डांबरी रस्त्यावर गिन्नी गवत किंवा दुसरे पीक लावले आहे. त्यामुळे या रस्त्याने एक चारचाकी वाहन समोरून आल्यास दुसर्‍या बाजूने येणारे चारचाकी वाहन कसेच बसू शकत नाही.

हा पट्टा ऊस उत्पादकांचा असून, या रस्त्याचे दर्जेदार काम होऊन रस्ता रुंदावल्यास उसाची दुरून भातकुडगाव फाटामार्गे होणाच्या वाहतुकीचा खर्च वाचेल, तसेच कुकाणा, भेंडा या सारख्या व्यापारी पेठांची व कारखान्यावर ये-जा करणार्‍यांसाठी हा रस्ता अत्यंत जवळचा आणि महत्त्वाचा असणारा आहे. ढोरजळगाव हद्दीतील सुमारे 1 किमी तर तेलकुडगाव हद्दीतील दीड किमी रस्ता हा हद्दीच्या वादात सापडलेला आहे. त्यामुळे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिसरातील ग्रामस्थांनी रस्त्याचा प्रश्न सुटला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

हे राहिले आमदार-खासदार

शेवगाव-नेवासा हा मतदार संघ झाल्यानंतर माजी आमदार तुकाराम गडाख, पांडुरंग अभंग, शिवाजी कर्डिले, नरेंद्र घुले, बाळासाहेब मुरकुटे, शंकरराव गडाख, तर शेवगावमधून चंद्रशेखर घुले, मोनिका राजळे आजपर्यंत आमदार राहिले आहेत. तर, माजी खासदार बाळासाहेब विखे, तुकाराम गडाख, दादा पाटील शेळके, दिलीप गांधी, सदाशिव लोखंडे, डॉ. सुजय विखे यांनी खासदारकी सांभाळली. परंतु गेल्या 25 वर्षांपासून आजतागायात या रस्त्याकडे कोणी ढुंकुनही पाहिले नसल्याची वस्तुस्थिती आहे.

आमदार शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून या रस्त्यासाठी निधीची तरतूद केली होती; मात्र शिंदे -भाजप शासनाच्या कार्यकाळात नेवासा तालुक्यातील विकास कामांना स्थगिती दिली गेल्याने रस्त्याचे काम रखडले आहे.

-मच्छिंद्र म्हस्के, शिवसेना तालुकाप्रमुख, ठाकरे गट

ढोरजळगाव हद्दीतील रस्त्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे व आमदार मोनिका राजळे यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून, लवकरच या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल.

-गणेश कराड, सरपंच, ढोरजळगाव

हेही वाचा 

सांगली जिल्ह्यात सलग 17 तास ‘जोरधार’; जनजीवन गारठले

अहमदनगर शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे प्रकल्प उभारू : महापौर रोहिणी शेंडगे

अहमदनगर : ओढ्यांवरील पाईप तसेच; ‘स्थायी’चे आश्वासन पाण्यात!

Back to top button